व्हिडिओकॉन कंपनी कर्जाच्या डोंगराखाली; विक्री होण्याची शक्यता

0

मुंबई : वेणूगोपाल धूत यांची प्रसिद्ध व्हिडिओकॉन ही कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. स्टेट बँकेसह ज्या बँकांनी व्हिडिओकॉनला कर्ज दिली आहेत त्यांनी नॅशनल कंपनी कायदा प्राधिकरण अर्थात एनसीएलटीकडे अर्ज केला आहे. या अर्जात व्हिडिओकॉन कंपनीविरुध्द दिवाळखोरीच्या कायद्यांतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

कंपनी विकून कर्ज वसूली

व्हिडिओकॉनवर सर्व बँकांनी मिळून दिलेले एकूण २० हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. गेल्या काही वर्षात कंपनीकडून होणाऱ्या कर्जच्या परतफेडीत मोठ्या प्रमाणात अनियमितपणा वाढत गेला असून गेल्या किमान सहा महिन्यात कंपनीने कर्जाची परतफेडपूर्ण थांबवली आहे. त्यामुळेच बँकांनी दिवाळखोरी कायद्यांतर्गत कंपनी विकून कर्ज वसूलीचे प्रयत्न सुरु केले आहेत.

१८० दिवसांत लिलाव

प्राधिकरणाने जर बँकांची मागणी मान्य केली तर १८० दिवसांत लिलाव करुन दिवाळखोर कंपनीसाठी नवा मालक शोधण्यात येईल. याप्रक्रियेत उभ्या रहाणाऱ्या पैशातून सर्वात आधी बँकांची देणी दिली जातात. त्यानंतर उरलेल्या रकमेतून कामागारांची देणी किंवा इतर काही आर्थिक बोजा असल्यास तो उतरवण्यात येतो. पण बँकांची मागणी मान्य करण्याआधी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या कंपनीचीही बाजू ऐकून घेतली जाते.