विधानभवनाच्या गटारीत दारूच्या बाटल्या!
हे देखील वाचा
नागपूर:- नागपूरच्या पावसाळी अधिवेशनात तिसऱ्या दिवशी आलेल्या पावसाने सरकारची चांगलीच पोलखोल केली आहे. विधानभवनाच्या शेजारून गेलेल्या गटारी तुंबल्यामुळे पाण्याचा निचरा होत नव्हता. याची पाहणी खुद्द अध्यक्ष आणि मंत्र्यांच्या उपस्थितीत करत असताना त्या गटारामधून दारूच्या आणि बियरच्या बाटल्या आढळल्याने खळबळ उडाली आहे.
गुरुवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने शुक्रवारी दिवसभर आपला जोर कायम ठेवला. विधानभवनाच्या पॉवर हाऊसमध्ये पाणी आल्याने कामकाज होऊच शकले नाही. विधान भवन परीसरात अनेक ठिकाणी पाणी तुंबल्यामुळे याची पाहणी करण्यासाठी अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे बाहेर पडले. यावेळी विधानभवनाच्या पाठीमागे असलेल्या गटारी तुंबलेल्या आढळल्या. त्यावेळी अध्यक्ष बागडे यांच्यासमोर गटारीतला कचरा काढण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्या गटारातून कचऱ्यासोबत दारूच्या आणि बियरच्या बाटल्या बाहेर निघाल्या. हे पाहून अध्यक्ष देखील चकित झाले. या बाटल्या नेमक्या आल्या कुठून? एवढी कडक सुरक्षा व्यवस्था असताना या बाटल्या कोण आणते? याला कुणाचा वरदहस्त आहे? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित केले जात आहेत.