विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीची काँग्रेसवर कुरघोडी!

0

शिवसेनेने भाजपासाठी तीन जागा सोडल्या

मुंबई – स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांसाठी जोरदार रंगत वाढत आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत आपल्या स्वबळाच्या घोषणेला तिलांजली देत शिवसेनेने सहापैकी तीन जागा भारतीय जनता पार्टीसाठी तीन जागा सोडण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले आहे तर एकत्रित लढण्याची भाषा करणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी होण्याची शक्यता कमी असून एक अतिरिक्त उमेदवार देत राष्ट्रवादीने काँग्रेसवर कुरघोडी केली आहे.

सहा जागांसाठी २१ मे रोजी मतदान होणार आहे. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करायचा गुरूवारी शेवटचा दिवस आहे. विधान परिषदेतील राष्ट्रवादीचे तीन, भाजपाचे दोन तर काँग्रेसचा एक सदस्य निवृत्त होत आहे. राष्ट्रवादीने जयवंत जाधव (नाशिक), अनिल तटकरे (रायगड-रत्नागिरी-सिंधुदूर्ग) आणि बाबाजानी दुर्रानी (परभणी-हिंगोली) यापैकी जाधव आणि तटकरे यांच्या जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. नाशिकमधून शिवाजी सहाणे आणि रायगडमधून सुनील तटकरे यांचे चिरंजीव अनिकेत तटकरे यांची उमेदवारी जाहीर केली आहे.

याशिवाय त्यांनी बीड-उस्मानाबाद-लातूरमधून भाजपामधून राष्ट्रवादीत दाखल झालेले रमेश कराड यांना उमेदवारी जाहीर केली आहे. ही जागा काँग्रेसची होती. तेथून काँग्रेसचे दिलीप देशमुख निवृत्त होत आहेत. त्यामुळे या जागेवर उमेदवार टाकून राष्ट्रवादीने काँग्रेसवर कुरघोडी केली आहे. परभणीतून राष्ट्रवादीचे बाबाजानीही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे.

भाजपाने मात्र त्यांचे प्रवीण पोटे-पाटील (अमरावती) आणि मितेश भांगडिया (वर्धा-चंद्रपूर) यांच्या जागी प्रवीण पोटे-पाटील (अमरावती) व रामदास आंबटकर (वर्धा-चंद्रपूर) यांची उमेदवारी जाहीर करतानाच राष्ट्रवादीतून भाजपात दाखल झालेले सुरेश धस यांना बीड-लातूर-उस्मानाबाद मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. शिवसेनेने त्यांचा एकही उमेदवार निवृत्त होत नसताना तीन जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. नाशिकमधून नरेंद्र दराडे, परभणी-हिंगोलीतून विपुल बाजोरिया आणि रायगड-रत्नागिरीमधून राजीव साबळे यांची उमेदवारी जाहीर केली आहे.