लक्षवेधीच्या वेळी मंत्री, आमदार गायब !

0
उपसभापतींनी मंत्री आणि आमदारांना झापले  

नागपूर – गोंधळामुळे आधीच कामकाज होत नसल्याची तक्रार मंत्री आणि आमदार देखील करत असतात. मात्र कामकाज सुरळीत सुरु असताना ह्याच मंत्री आणि आमदारांच्या अनुपस्थितीमुळे सभागृहाचे कामकाजच बंद करावे लागत असल्याचा प्रकार विधानपरिषदेत घडला. यावरून उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी याबाबत मंत्र्यांना आणि आमदारांना झापून काढत खंत व्यक्त केली.
पावसाळी अधिवेशनामध्ये शुक्रवारी विधान परिषदेत लक्षवेधींचे उत्तर देण्यासाठी मंत्रीच उपस्थित नसल्याने सभागृह तहकूब करण्यात आले. १६ पैकी १० लक्षवेधींचे उत्तर देण्यासाठी मंत्री आणि आमदार उपस्थित नसल्याने सभागृहाचे कामकाज १० मिनिटासाठी तहकूब करण्यात आले. याबद्दल उपसभापती माणिराव ठाकरे यांनी खंत व्यक्त केली.
पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या एका लक्षवेधीसाठी ती लक्षवेधी उपस्थित करणारे आमदार गोपीकिशन बाजोरीया उपस्थित नव्हते. ते का नाहीत? असा सवाल  करत कदम यांनी अशा आमदारांना समज द्या, अशी मागणी केली. मात्र, पुढील तब्बल १६ पैकी १० लक्षवेधीसाठी मंत्रीच नसल्याने उपसभापतींनी १० मिनिटांसाठी सभागृह तहकूब केले.
राज्यातील मंत्र्यांना आणि आमदारांना आपल्या विषयांचे गांभीर्य नाही. मंत्र्यांना सभागृह सुरू असताना सभागृहापेक्षा इतर कामे महत्त्वाची वाटता कामा नये, असे यावेळी उपसभापती माणिकराव म्हणाले. या प्रकाराबद्दल उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी तीव्र खंत व्यक्त करत सभागृह १० मिनिटांसाठी तहकूब केले.