मुंबई – पावसाळी अधिवेशन नागपूरला घ्यायचं की नाही घ्यायचं यामध्ये सरकारने वेळ घालवला आणि घ्यायचं ठरवल्यानंतर यंत्रणेला काम करायला वेळ मिळाला नाही त्यानंतर हा आजचा खेळखंडोबा झालेला दिसत आहे ही बाब निषेधार्य आणि चुकीची आहे अशा शब्दात विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी सरकारच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली.
हे देखील वाचा
पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या तिसऱ्यादिवशी विधानभवनातील कामकाज सकाळी १० वाजता सुरु झाले. विरोधक मुख्यमंत्र्याच्या राजीनामा मागण्यासाठी विधानभवनाच्या पायऱ्यावर बसून आंदोलन करत होते त्याचवेळी सभागृहाची लाईटच गायब झाली. सरकारच्या अनागोंदी कारभाराबाबत सर्वच विरोधी पक्षांनी नाराजी व्यक्त केली. विशेष करुन विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या कार्यालयातही लाईट नसल्याने त्यांनी मोबाईलच्या बॅटरीवर कागदपत्रांची पाहणी केली. सभागृहात लाईट नसल्याने अजित पवारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
आजचे हे सरकारचे अपयश आहे. महाराष्ट्रातील जनतेने हे चित्र पहावे. आज शेतकऱ्याला कशापध्दतीने वाऱ्यावर सोडले आहे. आज विधीमंडळामध्ये २८८ मतदारसंघातील आमदार इथे येवून आपली भूमिका मांडतात. त्यातून प्रश्नांची तड लागावी असा प्रयत्न असतो. महत्वाचे मुद्दे आम्ही कालपासून घेतले आहेत त्याला उत्तर देण्याऐवजी पाऊस जास्त झाल्यामुळे कामकाज होवू शकत नाही ही जी काही केविलवाणी अवस्था राज्यकर्त्यांनी केली आहे. निव्वळ हव्यासापायी,हट्टापायी हे सगळं घडलंय आणि त्यामुळे विधानभवन परिसरात पाणी तुंबलेले दिसत आहे. त्यामुळे कामकाज ठप्प झाले आहे असेही पवार म्हणाले.