अधिवेशनासाठी अडीच हजाराच्यावर लक्षवेधी दाखल!

0

तीन आठवडे चालणाऱ्या अधिवेशनासाठी 15 हजारांवर तारांकित प्रश्‍न

नागपूर : राज्य विधिमंडळाच्या बुधवारपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारपुढे विरोधक तसेच सत्ताधारी सदस्यांकडून केवळ तीन आठवडे चालणाऱ्या या अधिवेशनासाठी 15 हजारांवर तारांकित प्रश्‍न व अडीच हजारावर लक्षवेधी सूचना विधिमंडळ सचिवालयाकडे आल्या आहेत. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी विधानसभा आणि विधान परिषदेच्या सदस्यांकडून एकूण अडीच हजारावर लक्षवेधी सूचना प्राप्त झाल्या आहेत. सर्वाधिक लक्षवेधी सूचना या विधानसभेच्या सदस्यांकडून सादर झाल्या आहेत. अवघ्या 13 दिवसाच्या कार्यक्रम पत्रिकेत एवढ्या प्रश्नांवर चर्चा होईल का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी 27 जूनपासून लक्षवेधी सूचना स्विकारण्याला सुरवात झाली. विधान सभा व विधान परिषदेच्या सदस्यांकडून अशा एकून अडीच हजारावर लक्षवेधी सूचना संबंधित खात्याला सादर झाल्या आहेत. ही संख्या पुढे आणखी वाढण्याची शक्‍यता आहे. तातडीच्या जनहिताच्या मुद्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी विधान सभा आणि विधान परिषदेच्या सदस्यांना त्या त्या लक्षवेधी सूचना सभागृहात मांडता येतात.

विधानसभा व विधान परिषद सदस्यांनी जवळपास 15 हजारांवर तारांकित प्रश्‍न दिले आहेत. विधिमंडळ कामकाज समितीने आखलेल्या कामकाजानुसार विधिमंडळाच्या केवळ 13 बैठका होणार आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शेतकऱ्यांची कर्जमाफी, नागपुरातील कायदा व सुव्यवस्था या प्रश्‍नांवर विरोधक आक्रमक राहण्याची शक्‍यता आरहे. या काळात किती प्रश्‍नांची उत्तर मिळतील, हे काही दिवसातच स्पष्ट होणार आहे. शनिवारपर्यंत विधान सभेतील सदस्यांकडून आणि विधान परिषदेच्या सदस्यांकडून अशासकीय ठराव संबंधित विभागाला दिले गेले.