नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी विरोधकांचा गदारोळ; विधानपरिषद दिवसभरासाठी तहकूब

0
नागपूर: नुकसानग्रस्त धान आणि कापूस उत्पादक शेतकर्यांना अद्याप नुकसाभरभरपाई मिळालेली नाही मात्र सरकार खोटी जाहिरातबाजी करत असल्याचा आरोप करत विधानपरिषदेत सोमवारीही विरोधक आक्रमक झाले. यामुळे झालेल्या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज दुपारीच दिवसभरासाठी तहकूब करावे लागले. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी यासंदर्भात स्थगन प्रस्ताव मांडला.
बोंड अळी आणि तुडतुड्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे धान आणि कापूस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विरोधकांनी यावर आवाज उठवल्यावर सरकारने कापसासाठी प्रतिहेक्टरी ३४ हजार ७००तर धानाला १४ हजार रुपये हेक्टरी मदत जाहीर केली मात्र शेतकर्याच्या हातात दोन हजार रुपयांपेक्षा जास्त पैसे पडलेले नाहीत अशी टीका मुंडे यांनी यावेळी केली. मात्र सभापतींनी स्थगन प्रस्ताव फेटाळल्यामुळे विरोधकांनी गदारोळ केला. सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना कामकाज पहिल्यांदा अर्ध्या तासासाठी तहकूब करावे लागले. त्यानंतर कामकाज सुरू झाल्यानंतरही गदारोळ कायम राहिल्याने कामकाज पुन्हा अर्ध्या तासासाठी आणि पुन्हा दिवसभरासाठी  स्थगित करावे लागले.
या दरम्यान शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित करत गेल्या दोन दिवसात राज्यात पावसाने कहर केला असून , येत्या पाच दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज आहे या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गंभीर दखल घेण्याची मागणी केली.याला उत्तर देताना महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सरकारने खबरदारी घेतली असून आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील असं आश्वासन दिले. त्याचप्रमाणे राज्यातल्या पुलांवर सेन्सर बसवले असून नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर संबंधित  50 जणांना संदेश जात असल्याची माहिती पाटील यांनी दिली.