यावर्षी आषाढीला आमचा ‘पांडुरंग’ आमच्यासोबत नाही!

0

स्व. पांडुरंग फुंडकर यांना विधानसभेत श्रद्धांजली अर्पण करताना एकनाथराव खडसे झाले भावुक

नागपूर: विधानसभेत पहिल्याच दिवशी माजी कृषिमंत्री स्व. पांडुरंग फुंडकर यांना श्रध्दांजली अर्पण करताना माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे अत्यंत भावुक झाले. यावेळी बोलताना खडसे म्हणाले की, गेली कित्येक वर्षे मी मुक्ताईनगरहून तर ते मेहकर वरून आषाढी वारीसाठी पंढरपूरला जात असत. त्यांचे कुटूंब व माझे कुटूंब एकत्रच आषाडीला जायचा हा पायंडा पडला होता. पण यंदा आषाडी जवळ आली आहे. पण आमचा पांडुरंगचं आज आमच्यासोबत नाही असे खडसे यावेळी म्हणाले.

खडसे पुढे म्हणाले की, कृषी खात्यात काम करताना त्यांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले. ओबीसींच्या चळवळीत त्यांचे मोलाचे योगदान
ओबीसींना न्याय मिळावा यासाठी गोपीनाथरावांसोबत भाऊसाहेबांचे काम मोलाचे आहे, या चळवळीत उणीव भासत राहील असे खडसे म्हणाले. ते म्हणाले की, कृषी, सहकार, शिक्षण क्षेत्रात त्यांचे काम मोठे आणि प्रभावी आहे. आमच्या दोघात नेहमी लपंडाव राहायचा. मी आत असलो की ते बाहेर राहायचे, मी मंत्री झालो तर ते सदस्य नव्हते. यावेळी खडसे अत्यंत भावुक झाले.

मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत मांडला शोक प्रस्ताव
विधान सभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आपल्या शोक प्रस्तावात दिवंगत फुंडकर यांचे कार्य सविस्तर विशद करुन भावपूर्ण आदरांजली वाहिली. तसेच दिवंगत पांडुरंग फुंडकर यांचा विधिमंडळाचा उत्तम अनुभव हा मार्गदर्शक असून त्यांनी विधिमंडळात केलेल्या भाषणाचे लवकरच पुस्तक विधिमंडळामार्फत प्रकाशित केले जाईल, असे म्हटले. तसेच दिवंगत सदस्य भाई वैद्य, बापुराव पानघाटे, दगडू बडे-पाटील यांच्या कार्याबद्दलही गौरवोद्गार काढून भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोक प्रस्तावात दिवंगत भाऊसाहेब फुंडकर यांनी शेती व मातीशी इमान असलेले नेते असून, त्यांच्या निधनाने आधारवड कोसळला अशी भावना व्यक्त केली. ते एक समर्पित व्यक्तीमत्व असून आपल्या जबाबदारीचे उत्तम अनुपालन करत संघटनेला सर्वौच्च स्थान देणारे नेते होते. उत्तम व समृध्द शेतीसाठी त्यांनी विविध योजना राबविण्याचे निर्णय घेतले, असे सांगून आदरांजली वाहिली. तसेच माजी राज्यमंत्री दिवंगत भाई वैद्य यांच्या कार्याचा आढावा घेतला. दिवंगत बापुराव पानघाटे व दिवंगत दगडू बडे-पाटील यांच्या कार्याबद्दलही माहिती देऊन श्रध्दांजली अर्पण केली.

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील दिवंगत फुंडकर यांना श्रध्दांजली वाहताना संयमी, संवेदनशील, निगर्वी वर्तणूक असलेला, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सदैवाने अग्रभागी सहभाग असलेला नेता, एखाद्या विषयाची महती लक्षात येताच त्या विषयाच्या निर्णयापर्यंत ते जात असल्याचे सांगितले. तसेच इतर दिवंगत सदस्यांनाही त्यांच्या कार्याचा उल्लेख करुन श्रध्दांजली अर्पण केली.

भाऊसाहेबांच्या जाण्याने राज्यातील शेतकऱ्यांचे नुकसान- धनंजय मुंडे
भाऊसाहेब फुंडकर यांच्या जाण्याने भाजपाचेच नुकसान झाले नाही तर राज्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे विचार विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त करताना भाऊसाहेबांना आदरांजली वाहिली. भाऊसाहेबांनी आयुष्यभर शेतकऱ्यांसाठी संघर्ष केला आणि जेव्हा शेतकऱ्यांसाठी काही करण्याची संधी मिळाली त्याचवेळी नेमकं ते सोडून गेले. अजातशत्रु व्यक्तीमत्व आज काळाच्या पडदयाआड गेले आहे. भाऊसाहेबांचे नेतृत्व हे खऱ्याअर्थाने शेतकऱ्यांचे नेतृत्व होते. भाजपचे कर्मठ कार्यकर्ते म्हणून त्यांची जास्त ओळख होती. त्यांनी आणि स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेसाहेबांनी ग्रामीण भागात खऱ्या अर्थाने भाजप पोचवली असेही मुंडे म्हणाले. भाऊसाहेबांनी भाजपसाठी आयुष्य वेचले मात्र सत्ता आल्यानंतर पहिल्यावेळी मंत्रीपद मिळू शकले नाही मात्र त्यांनी कधी नाराजी दाखवली नाही असेही धनंजय मुंडे म्हणाले.