मुंबई – संपूर्ण देशात गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जात असला तरी महाराष्ट्रात खास करून मुंबईत या उत्सवाचे चैतन्य काही औरच असते. उत्सवाचे हेच चैतन्य छोट्या पडद्यावर उमटले नाही तर नवलच..! गणेशोत्सवाच्या या काळात छोट्या पडद्यावरसुद्धा बाप्पांच्या कार्यक्रमाची धूम पहायला मिळते. मराठी मनोरंजनाच्या दुनियेत आपल्या प्रेक्षकांना सातत्याने नवनवीन दर्जेदार कार्यक्रम देणाऱ्या फक्त मराठी वाहिनीने या गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर विघ्नहर्ता गणपती या कार्यक्रमाची विशेष भेट प्रेक्षकांसाठी आणली आहे.
गणेशोत्सवाचं औचित्य साधत कीर्तनाच्या संकल्पनेवर आधारित विघ्नहर्ता गणपती हा कार्यक्रम फक्त मराठीवर शुक्रवार २५ ऑगस्टपासून मंगळवार ५ सप्टेंबरपर्यंत दररोज सकाळी ७.३० वा. प्रसारित होणार आहे. या कार्यक्रमात प्रसिद्ध कीर्तनकार श्रीगणेशावर आधारित कीर्तन करणार असून त्या निरुपणाचा आस्वाद प्रेक्षकांना घरबसल्या घेता येईल. निवेदकाच्या माध्यमातून रंगणाऱ्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेत्री रुचिता जाधव करणार आहे.
या कार्यक्रमाबद्दल बोलताना फक्त मराठीचे बिझनेस हेड श्याम मळेकर म्हणाले की,
प्रेक्षकांच्या अभिरुचीचा विचार करून आम्ही नवनवे कार्यक्रम प्रेक्षकांसाठी आणत असतो. या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांचा गणेशोत्सव अधिक मंगलमय करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत.