मुंबई- मराठी नाटक,चित्रपट आणि मालिका या तिन्ही माध्यमातून आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या अभिनेते विजय चव्हाण यांच्या निधनाने चित्रपट आणि नाटक क्षेत्राची मोठी हानी झाली असून आहे, या शब्दांत राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी विजय चव्हाण यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
मराठी नाटक, चित्रपट, मालिका ही तिन्ही माध्यमे ४० वर्षे आपल्या दमदार अभिनयाने व्यापून टाकणारे अष्टपैलू अभिनेते विजय चव्हाण यांना महाराष्ट्राच्या कलाविश्वाने गमाविले आहे. विनोदाचं उत्तम टायमिंग असलेल्या विजूमामा यांची ही एक्झिट मनाला हळहळ लावणारी आहे. भावपूर्ण श्रद्धांजली!
— Vinod Tawde (@TawdeVinod) August 24, 2018
१९८५ मध्ये ‘वहिनीची माया’ या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेल्या विजय चव्हाण यांनी त्यांच्या दमदार अभिनयाने गेली अनेक वर्षे मराठी चित्रपटसृष्टी गाजविली.
विजय चव्हाण यांच्या नाटक-चित्रपट क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल काही महिन्यांपूर्वीच त्यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते, अशा या कसदार अभिनयाच्या अष्टपैलू कलाकाराच्या निधनाने नाटक, चित्रपट क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाल्याचेही शेवटी तावडे यांनी म्हटले आहे.