राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांची माहिती
जळगाव – देशात आजपर्यंत झालेल्या प्रत्येक निवडणूकीत महागाईचा मुद्दा गाजला आहे. यावेळेची निवडणूक मात्र वेगळी असुन या निवडणुकीत महागाईचा मुद्दाच नसल्याची माहिती राज्या महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत रहाटकर म्हणाल्या, मोदी सरकारच्या काळात महागाईचा दर कमी झाला आहे. कांद्याचे भाव कमी आहेत, त्यामुळे सर्वसामान्य माणसाला दिलासा आहे. या निवडणूकीत महागाईचा मुद्दाच राहिला नाही. स्वातंत्र्यानंतर देशात झालेल्या लोकसभा निवडणूकीपैकी महागाईचा मुद्दा नसलेली ही पहिलीच निवडणूक आहे. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी शहिद हेमंत करकरे यांच्याबाबत केलेल्या विधानाबाबत रहाटकर म्हणाल्या, प्रज्ञासिंहाचे विधान चुकीचे आहे. हेमंत करकरे हे शहीद झालेले आहेत. जळगाव लोकसभा मतदार संघात आमदार स्मिता वाघ यांची उमेदवारी अर्ज भरल्यानंतर भाजपतर्फे रद्द करण्यात आली, हा त्यांच्यावर अन्याय नाही काय?या प्रश्नाला उत्तर देतांना त्या म्हणाल्या, हा पक्षाचा निर्णय आहे. त्यांनीही तो मान्य केला आहे. त्यांची कोणतीही नाराजी नाही. त्या पक्षाचे उमेदवार उन्मेष पाटील यांच्या प्रचारात सक्रिय आहेत. यावेळी अस्मिता पाटील, नगरसेविका सरीता नेरकर, गिताजंली ठाकरे, नगरसेविका उज्वला बेंडाळे,रेखा कुळकर्णी, रेखा वर्मा उपस्थित होते.