मुंबई| माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लागू केलेल्या आणीबाणीवर आधारित ‘इंदु सरकार’ सिनेमा सध्या तरी काँग्रेसमध्ये विशेष चर्चेत आहे. मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी घेतलेल्या आक्षेपानंतर आता विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रकरणात लक्ष घातले आहे. ‘इंदू सरकार’ चित्रपटात इतिहासाचा विपर्यास झाल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.
सिनेमाच्या ट्रेलरवरुन हा सिनेमा आणीबाणीवर आधारित आहे हे स्पष्ट जाणवते. त्यामुळे या सिनेमात इंदिरा गांधी आणि संजय गांधी यांना कशा पद्धतीने दाखवण्यात आले आहे, हे आम्हाला पाहायचे आहे, अशी मागणी संजय निरुपम यांनी सेन्सॉर बोर्डाचे पहलाज निहलानी यांना लिहिले होते. याच पार्श्वभूमीवर संबंधित चित्रपटात वस्तुस्थितीशी छेडछाड करून दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी आणि स्व. संजय गांधी यांची प्रतीमा मलीन करण्याचा प्रयत्न झाला तर काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून रोष व्यक्त करू शकतात. त्यामुळे संभाव्य वाद टाळण्याच्या हेतूने प्रदर्शनापूर्वी हा चित्रपट संबंधितांना दाखविण्याची मागणी कार्यकर्त्यांकडून केली जाते आहे असे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने निर्माण होणार्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात तातडीने हस्तक्षेप करावा; जेणेकरून संभाव्य अप्रिय घटना टाळता येतील.
-राधाकृष्ण विखे पाटील,
विरोधी पक्षनेता, विधानसभा
‘इंदु सरकार’ या सिनेमाबद्दल थोडा चिंतीत आहे. हा सिनेमा प्रदर्शनाआधी पाहून ही खात्री करुन घ्यायची आहे की या सिनेमातून कोणत्याही प्रकारे काँग्रेसच्या नेत्यांची प्रतिमा मलिन करण्यात आली नाही.
-संजय निरुपम,
अध्यक्ष, मुंबई प्रदेश काँग्रेस
Web Title- vikhe patil against indu sarkar