मुंबई-प्रसिद्ध अभिनेते दिवंगत विनोद खन्ना यांची पत्नी गीतांजली खन्ना यांचे काल हृदयविकाराने निधन झाले. खन्ना कुटुंबीयांचे अलिबाग तालुक्यातील मांडवा परिसरात फार्म हाऊस आहे. त्याठिकाणी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या ७० वर्षांच्या होत्या. आज सकाळी गीतांजली खन्ना यांचे पार्थिव जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले. यावेळी अभिनेता अक्षय खन्ना व राहुल खन्ना ही दोन्ही मुले त्यांच्या सोबत होती.
सन १९७१ मध्ये विनोद खन्ना यांनी गीतांजलीसोबत लग्न केले होते. पण अचानक विनोद खन्ना आपले फिल्मी करिअर, कुटुंब सगळे काही मागे सोडून ओशोच्या सेवेत लागले. त्यांनी कुटुंबापासून फारकत घेतली. सगळे काही सोडून विनोद यांनी अमेरिकेत ओशो कम्युन रजनीशपूरममध्ये राहण्याचा निर्णय घेतला.
विनोद यांच्या या निर्णयाने गीतांजली यांनी अक्षय व राहुल या दोन मुलांना घेऊन विभक्त होण्याचा निर्णय घेतला. पुढे त्यांनी विनोद यांना घटस्फोट दिला. अर्थात या घटस्फोटानंतर पाच वर्षांनी विनोद खन्ना मुंबईला परतले आणि त्यांनी नव्याने आयुष्य सुुरू करण्याचा निर्णय घेतला. १९९० मध्ये त्यांनी कवितासोबत दुसरे लग्न केले. कवितापासून विनोद खन्ना यांना साक्षी हा मुलगा व श्रद्धा ही मुलगी अशी दोन मुले झाली. अर्थात पहिल्या पत्नीपासून घटस्फोट होऊनही विनोद यांनी पित्याचे कर्तव्य निभावले. अक्षय खन्नाला बॉलिवूडमध्ये लॉन्च करण्यासाठी त्यांनी ‘हिमालय पुत्र’ हा चित्रपट बनवला. राहुलचे करिअरही त्यांनी मार्गी लावले. २७ एप्रिल २०१७ रोजी विनोद खन्ना यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पाठोपाठ त्यांच्या पहिल्या पत्नी गीतांजली यांनीही जगाचा निरोप घेतला.