श्रीनगर : लपून बसलेल्या दहशतवाद्यांवर केलेल्या लष्करी कारवाईत तीन संशयित दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आलेल्यानंतर बुधवारी श्रीनगरमध्ये पुन्हा हिंसाचार उफळून आला. लष्कराने दहशतवाद्यांविरोधात जोरदार मोहीम उघडली असून, आतापर्यंत हिज्बुल मुजाहिद्दीनचे तीन संशयित दहशतवादी ठार मारण्यात आले आहेत. पोलिस व सैन्य दलाच्या जवानांनी काश्मीर खोर्यात जोरदार शोधमोहीम हाती घेतली असून, रेडोरा भागात दहशतवादी व सुरक्षा जवान यांच्यात जोरदार धुमश्चक्री उडाली होती. तसेच, स्थानिक तरुणांनीही जवानांवर दगडफेक करत कारवाईत अडथळे आणले. दुसरीकडे, पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत, भारतीय सीमेत गोळीबार केला. त्यात दोन जवान शहीद झाले आहेत. भारतीय सैन्यानेही पाकड्यांना जोरदार प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली होती. कुपवाडा सेक्टरमध्ये गोळीबाराची ही घटना घडली.
स्थानिक युवकांची दगडफेक
सुरक्षा जवानांच्या कारवाईत मारल्या गेलेल्या हिज्बुल मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांची नावे दाऊद आणि जावेद अशी हाती आली आहेत. पोलिस व लष्कराच्या या कारवाईनंतर श्रीनगरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उफळून आला. स्थानिक युवकांनी सुरक्षा दलाच्या कारवाईत अडथळा आणत त्यांच्यावर दगडफेक केली. त्यातच संशयित दहशतवाद्यांनीही जवानांवर गोळीबार सुरु केला. त्यामुळे पोलिस व लष्करी जवानांची अतिरिक्त कुमक तैनात करण्यात आली होती. सुरक्षादलाने शोधमोहीम व लष्करी कारवाईसाठी काही घरांना खाली केले असून, जोरदार ऑपरेशन हाती घेतले होते.
पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन
दुसरीकडे, पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे वारंवार उल्लंघन होतच असून, कुपवाडा सेक्टरमध्ये पेट्रोलिंग करणार्या जवानांवर पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारात दोन जवान शहीद झालेत. भारतातर्फे पाकिस्तानलाही चोख प्रत्युत्तर देण्यात येत होते. काल रात्रीपासून सुरु असलेली ही धुमश्चक्री दिवसाही सुरुच होती. बडगाम भागातही पाक व भारतीय सैन्याचा गोळीबार सुरु होता. भारतीय सैन्याने संशयित दहशतवाद्यांनाही लक्ष्य करत, त्यांच्याविरुद्ध जोरदार मोहीम हाती घेतली होती. अमरनाथ यात्रेकरुंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर लष्कराने दहशतवाद्यांविरोधात जोरदार मोहीम हाती घेतली आहे.
Web Title- Violence in Shrinagar