नवी दिल्ली: विश्वचषक स्पर्धेत उपांत्य सामन्यात न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागल्यामुळे भारतीय संघाचे विश्वचषक स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले दरम्यान विश्वचषक स्पर्धेतील खेळाडुंच्या निवड प्रक्रियेसंदर्भात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या प्रशासकीय समितीकडून भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांना जाब विचारण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या या समितीमध्ये अध्यक्ष विनोद राय, डायना एडुलजी आणि निवृत्त जनरल रवी थोडगे यांचा समावेश आहे.
भारतीय संघ इंग्लंडमधून परतल्यानंतर ही समिती विराट कोहली आणि रवी शास्त्री यांच्याशी चर्चा करेल. तसेच पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेन्टी-२० स्पर्धेसाठी बीसीसीआयची काय रणनीती आहे, यासंदर्भात निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांच्यासोबतही प्रशासकीय समितीच्या अधिकाऱ्यांची बैठक होईल, अशी माहिती विनोद राय यांनी दिली.
विश्वचषक स्पर्धेच्यावेळी बदली खेळाडू म्हणून अंबाती रायडूला डावलून ऋषभ पंत आणि मयांक अग्रवाल यांना इंग्लंडमध्ये पाचारण करण्यात आले होते. यावरून बराच गदारोळही झाल होता. त्यामुळे आगामी बैठकीत यासंदर्भात रवी शास्त्री, विराट कोहली आणि एमएसके प्रसाद यांना प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे.