नवी दिल्ली : भारताचा कर्णधार विराट कोहली आणि सलामीचा फलंदाज रोहित शर्मा यांचे मॅच फिक्सरशी संबंध असल्याचे वृत्त एका आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनीने ‘क्रिकेट के मैच फिक्सर्स: द मुनवर फाइल्स’ या डॉक्यूमेंट्रीच्या माध्यमातून दिली आहे. त्यामुळे क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर 2011-12 या हंगामात एकूण 15 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये तब्बल 26 वेळा स्पॉट फिक्संग झाल्याचेही समोर आले आहे.
भारतामध्ये झालेल्या तीन सामन्यांमध्ये स्पॉट फिक्संग झाल्याचे या डॉक्यूमेंट्रीमध्ये सांगण्यात आले आहे. 2011 साली झालेल्या विश्वचषकातील पाच आणि 2012 साली झालेल्या ट्वेन्टी-20 विश्वचषकातील तीन सामन्यांमध्ये फिक्संग झाल्याचेही या डॉक्यूमेंट्रीमध्ये म्हटले गेले आहे.
आयसीसीच्या रडारवर मुनवर नावाचा एक मॅच फिक्सर आहे. या मुनवरने 2011 साली लॉर्ड्सवर झालेल्या कसोटी सामन्यात फिक्संग झाल्याचे सांगितले आहे. या मुनवरबरोबर विराट आणि रोहित यांचे संबंध असल्याचेही पुढे आले आहे. या मुनवरबरोबर या दोघांचे फोटोही प्रसिद्ध झाले आहेत. 2012च्या ट्वेन्टी-20 विश्वचषकादरम्यान विराट आणि रोहित यांनी मुनवरबरोबर फोटो काढल्याचे डॉक्यूमेंट्रीमध्ये म्हटले गेले आहे.