विटनेर येथील विवाहितेचा संशयास्पद मृत्यू

0

माहेरच्यांचा आरोप ; विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची गावकर्‍यांकडून माहिती

जळगाव – शेतातील मजुरांना पिण्याचे पाणी घेण्यासाठी गेलेल्या राणी दीपक मकासरे (वय 24, रा. जळके, ता.जळगाव) या विवाहितेचा विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील विटनेर येथे गुरुवारी सकाळी घडली आहे. दरम्यान सासरच्यांनी केलेल्या मारहाणीत तिचा मृत्यू झाल्याचा आरोप राणीच्या माहेरच्यांनी केला असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याचा पावित्रा घेतला होता.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राणी मकासरे हिचे परळी वैजनाथ हे माहेर तर जळगाव तालुक्यातील जळके सासर आहे. विटनेर शिवारात शेत असून बुधवारी सायंकाळी चांगला पाऊस झाल्यामुळे शेतातील कामांसाठी राणी मकासरे या काही महिलांसह गुरुवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास शेतात गेल्या होत्या. राणी मकासरे या सकाळी शेतात पोहोचल्यानंतर मजुरांना पिण्यासाठी पाणी घ्यायला विहिरीजवळ गेल्या. त्याच वेळी विहिरी जवळ असलेल्या इलेक्ट्रिक मोटरच्या लोखंडी पेटीला त्यांचा स्पर्श झाल्याने विजेचा धक्का लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. नागरिकांनी याप्रकाराची माहिती एमआयडीसी पोलिसांना कळविली. त्यानुसार पोलीस उपनिरिक्षक विशाल वाठोरे व संतोष सोनवणे यांनी घटनास्थळ गाठून मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

गुन्हा दाखल करा; मृतदेह ताब्यात घेणार नाही
राणी हिला माहेरुन पैसे आणावेत, तसेच दुसरीही मुलगीच झाल्याने सासरच्यांकडून त्रास दिला जात होता. या कारणाने तिची परळी वैजनाथ येथील बहिण पवित्रा मोहन सावनेर ही बुधवारी राणीला घेवून जाण्यासाठी आली होती. पवित्राला राणीने जाण्यास नकार दिल्याने गुुरुवारी सकाळी पवित्रा पुन्हा परळी वैजनाथकडे जाण्यासाठी निघाली असता आठ वाजता प्रवासात तिला राणीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. ती पुन्हा जळगावकडे परतली. मी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत शवविच्छेदन करण्याची मागणी केली. सासरचे कोणीही याठिकाणी आले नाही. जिल्हा रुग्णालयात पोहचल्यावर पवित्रा हिने बहिणीचा मृतदेह बघितला. तिला शॉक लागल्याबाबत कुठलेही व्रण शरिरावर नव्हते. मारहाणीच्या जखमा असल्याने सासरच्यांनी तिला मारले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावी अशी मागणी केली व गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पावित्रा घेतला. यावेळी पवित्रासह तिच्या इतर तिनही बहिणी रुग्णालयात होत्या तर आई वडील जळगावकडे येण्यासाठी निघाले होते. अखरे पोलिसांनी मध्यस्थी केल्यावर मृतदेह ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे.