नवी दिल्ली: १७ व्या लोकसभा निवडणुकीतील ७ पैकी 4 टप्प्यांमधील मतदान झाले आहे. उर्वरित तीन टप्प्यांमधील मतदानाच्या काळात रमजान देखील सुरु होणार आहे. त्यामुळे या तीन टप्प्यांमध्ये मतदानाची प्रक्रिया सकाळी ७ ऐवजी ५ वाजल्यापासून सुरु करावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका मुस्लीम संघटनांनी सुप्रीम कोर्टात दाखल केल्या आहेत. या जनहित याचिकांवरील सुनावणीदरम्यान ‘निवडणूक आयोगाने यासंदर्भात योग्य तो निर्णय घ्यावा’, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. त्यामुळे आता निवडणूक आयोग काय निर्णय घेते याकडे लक्ष लागले आहे. आज सुप्रीम कोर्टात याचिकेवर सुनावणी झाली.
६, १२ आणि १९ मे रोजी उर्वरित तीन टप्प्यांमधील मतदान होणार आहे. शेवटच्या तीन टप्प्यांमध्ये एकूण १६९ जागांसाठी मतदान होणार आहे. मुस्लीम समाजात रमजानचा महिना पवित्र मानला जातो. यंदा ५ किंवा ६ मेपासून रमजानला सुरुवात होणार आहे. रमजानच्या कालावधीत मतदानाची प्रक्रिया सकाळी सात ऐवजी पाच वाजता सुरु करावी अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाली होती.