शेतातील पत्र्याच्या घराला आग

0

लग्नाच्या बस्त्यासह दिड लाख रूपये जळून खाक

भडगाव(प्रतिनिधी) तालुक्यातील वाडे येथील राजेंद्र भिकारी परदेशी यांचे शेतातील पत्र्याच्या घराला अचानक आग लागुन मुलीच्या लग्नाचा बस्ता, सोने, दिड लाख रुपये रोख, ९० क्किंटल कांदा, ३ पोते धान्य, कपाशी बियाण्याच्या ६ थैल्या, कपडे, दाळी,१२ कोंबड्या, भांडे, संसारोपयोगी वस्तु , मुलांचे व शेतीचे कागदपत्रे आदि वस्तु जळुन खाक झाल्या. शेतकरी, नागरीकांनी मदतीसाठी धाव घेत बादल्यांनी पाणी मारुन आग आटोक्यात आणली. मात्र या आगीत सारा संसार जळुन खाक झाला. महसुल प्रशासनाने सुमारे ७ लाख रुपये नुकसानीचा पंचनामा केला आहे. ही घटना दि. ८ रोजी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास घडली . मुलीचे लग्नसोहळा तोंड्यावर आला असुन या कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे .
याबाबत माहीती अशी की, तालुक्यातील वाडे येथील शेतकरी राजेंद्र भिकारी परदेशी हे शेतातच पत्र्याच्या घरात राहत होते. त्यांची मुलगी वर्षा हीचे लग्न दि.१५ जुन रोजी ठरलेले आहे. त्यामुळे आई वडीलांनी लग्नाआधी लग्नाचा बस्ता, सोने, व दिड लाख रुपये नातेवाईकांकडुन मुलीच्या लग्नासाठी घरात आणुन ठेवले. सकाळी आई, वडील व मुलगी कामानिमित्त गावात गेलेले होते. शेतात मुलगा व मुलगी घराबाहेर शेताचे काम करीत होते.घराला आग लागताच भडका झाला. मुलांनी घराकडे धाव घेतली.मात्र आगीने प्रचंड भडका पकडल्याने शेजारील शेतकरी व नागरीकांनी घटनास्थळी मदतीसाठी धाव घेतली. बाजुच्या विहीरीतुन पाणी काढुन बादल्या, हंड्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. आग हळु हळु आटोक्यात आली. मात्र सारा संसार जळुन खाक झाला होता. गावात कुटुंबाला घटनेची वार्ता कळताच त्यांनी घराकडे धाव घेतली. आदल्यादिवशीच घरात दिड लाख रुपये, सोन्याच्या वस्तु आणुन ठेवल्या आणि दुसर्या दिवशी ही घटना घडली. वाडे येथील तलाठी बी. डी. मंडले यांनी ७ लाख रुपये नुकसानीचा पंचनामा केलेला आहे. घटनास्थळी पोलीस पाटील भुषण पाटील, कोतवाल आबा मोरे, यांचेसह नागरीकांची उपस्थिती होती.