जीव धोक्यात घालून पाण्यासाठी भटकंती

0

ठाणे – शहापूर तालुक्यातील खर्डी गावात पाणी टंचाईमुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहे. या गावात ब्रिटीशकालीन बांधलेल्या एकमेव विहिरीचा गावकऱ्यांना आधार होता. मात्र, गेल्या ४ ते ५ वर्षांपासून या विहरीचे पाणी दूषित झाल्याने येथील नागरिकांना पर्यायी स्त्रोतांचा शोध घ्यावा लागतो. त्यामुळे येथील महिलांना जीव धोक्यात घालून रेल्वे रुळ ओलांडत पाण्यासाठी भटकंती करत असल्याचे भयाण वास्तव समोर आले आहे.

शहापूर तालुका धरणाचा तालुका म्हणून महाराष्ट्रात ओळखला जातो. मात्र गेल्या १० ते १५ वर्षापासून हाच तालुका पाणी टंचाईग्रस्त तालुका म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. त्यातच तालुक्यातील खर्डी गाव हे महत्वाची बाजारपेठ म्हणून ओळख आहे. मात्र, या गावाला पाणी टंचाईचे सावट यंदाही कायम आहे. खर्डी ग्रामपंचातीत असलेल्या एकमेव ब्रिटीशकालीन विहिरीने तळ गाठला असून गावाला पाणी पुरवठा करणारी एकमेव विहीर आहे. मात्र, गेल्या ४ ते ५ वर्षापासून या विहिरीच्या स्वच्छेतेकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने या विहिरीचे पाणी दुषित झाले आहे. त्यामुळे हे पाणी पिण्यायोग्य राहिले नाही.

गावातील महिलांनी या विहिरीच्या स्वच्छेतेकडे आणि दूषित पाण्याबाबत ग्रामपंचातीकडे अनेक तक्रारी केल्या. तसेच ग्रामसभेत पाणी समस्याही मांडली. मात्र, ग्रामपंचायत प्रशासन या गंभीर प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप गावातील महिलांनी केला आहे. विशेष म्हणजे शासनाकडून दरवर्षी विहिरी सफाई निधी मिळतो. मात्र, तो निधी कोणाच्या खिशात जातो, असा सवालही महिलांनी उपस्थित केला आहे.

गावातच राहणाऱ्या एका महिलेने पाणी टंचाईची व्यथा मांडताना सांगितले की, माझ्या लग्नाला ३० वर्ष झाली मी या गावात आल्यापासून या विहिरीचे पाणी भरते. मात्र, गेल्या ६ वर्षांपासून या विहिरीच्या स्वच्छेतेकडे ग्रामपंचायत प्रशासन लक्ष देत नसल्यानेमुळेच आज या विहिरीचे पाणी पिण्या योग्य राहिले, ना वापरण्या योग्य, आतातर या पाण्याला दुर्गंधी येत असल्याने या विहिरीवर महिला पाणी भरण्यासाठी येत असल्याचा आरोप केला.

याबाबत गावातील महिलांनी अनेक वेळा ग्रामपंचायती जाऊन तक्रार केली. मात्र, अद्याप या विहिरीच्या स्वच्छेतेकडे लक्ष दिले जात नाही. यामुळे आम्हाला ५ ते ६ किलोमीटर पायपीट करत जीव धोक्यात घालून रेल्वे रुळ ओलांडत पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे या महिला यावेळी सांगत होत्या. त्यामुळे प्रशासन तात्काळ या विहिरीची स्वच्छता करून, इतर दुसरा पाण्याचा स्त्रोत उपलब्ध करुन देण्याची मागणी या महिलांनी केली आहे.