जळगाव – हातात भगव्या पताका अन् डोक्यावर तुळशी… टाळ, मृदंगाचा गजर…ज्ञानोबा, तुकोबाचे नामस्मरण…अशा चैतन्यमय वातावरणात पंढरीच्या दिशेने निघालेल्या वारकर्यांच्या पुण्यात वाटेकरी होण्याचा प्रयत्न जळगाव मधील तरुणांकडून केला जात आहे. याचे निमित्त आहे…श्रीराम मंदीर संस्थानच्या पालखीतील वारकर्यांची थेट कन्नड घाटात जावून मनोभावे सेवा कारण्याचे!
आजची तरुणाई भरकटत चालली आहे, असा आरोप सातत्याने होतो मात्र यास पूणपणे छेद देण्याचे काम जळगावमधील 100 तरुणांकडून होत आहे. हे तरुण गेल्या दहा वर्षांपासून नियमितपणे वारकर्यांची निस्वार्थपणे सेवा करत आहेत. जळगाव शहरातून पंढरपूरकडे पायी पालखी निघाल्यानंतर पालखीचे जागोजागी स्वागत होते तेथे त्यांच्या चहा नाश्त्यासह जेवणाचीही व्यवस्था केली जाते मात्र ही पालखी कन्नड घाटात पोहचल्यानंतर सुमारे 15 किमी अंतरापर्यंत त्यांसाठी पिण्याचे पाणीही नसते तसेत घाट चढतांना त्याची दमछाक होवून अनेकांची प्रकृतीही बिघडते. ही बाबत लक्षात घेवून प्रितेश ठाकूर या तरुणाने 10-15 मित्रांच्या मदतीने कन्नड घाटात जावून वारकर्यांसाठी स्वखर्चाने चहा-नाश्ता उपलब्ध करुन देण्याचा विडा उचलला. हे तरुण वारकर्यांचे हात-पाय दाबून देणे, पायी चालून जखमी झालेल्यांची तेल मालिश क रणे, प्राथमिक औषधोपचार करुन देत वैद्यकीय सेवा देणे अशा वेगवेगळ्या प्रकारे सेवा देतात. आता अशा अनोख्या पध्दतीने वारकर्यांची सेवा करण्यासाठी थेट कन्नड घाटात जाणार्या तरुणांची संख्या 100च्या वर पोहचली आहे.
मध्यरात्री दोन वाजता गाठला कन्नड घाट
यंदाही ही 15 ते 20 चारचाकींमधून या गृपने मध्यरात्री दोन वाजता कन्नड घाटाचा मध्यभाग गाठला. रात्रीपासूनच तेथे नाश्त्यासाठी पोहे व चहाची व्यवस्था केली. पिण्याच्या पाण्यासाठी जागोजागी शुध्द पाण्याच्या बाटल्यांचे स्टॉल लावले. पहाटे पाच वाजेपासून या मार्गावरुन वारकर्यांचे आगमन होण्यास सुरुवात झाल्यानंतर या माऊली…अशी हाक देत त्यांची सेवा करण्यात एकमेंकांमध्ये जणू स्पर्धाच लागल्याचे चित्र होते. विशेष म्हणजे यात काही तरुण परिवारासह सहभागी झाले होते. त्यातील महिला व त्यांची चिमुकली मुलेही वारकर्यांची सेवा करण्यात गुंग झाल्याचे चित्र सर्वदूर दिसून येत होते. यावेळी काहींनी वारकर्यांसोबत फुगडी खेळली तर काहींनी टाळ-मृंदंगावर भक्तिमय श्रध्देने ठेका धरला. हे दृष्य महामार्गावरुन जाणार्या वाहनांमधील प्रवासी आपल्या मोबाईलमध्ये चित्रीत करत होते. सेवा झाल्यानंतर कन्नड घाटात वृक्षारोपण करण्यात आले यात वड, निंब, पिंपळ आदींचे रोपटे लावण्यात आले.
स्वखर्चने उपक्रम
वारकर्यांनी ही सेवा देण्यासाठी कोणकडूनही पैसे न घेता जो-तो आपआपल्या परीने खर्च करत असल्याचे प्रितेश ठाकूर यांनी जनशक्तिशी बोलतांना सांगितले तर यात सहभागी अजिंक्य देसाई म्हणाला की, हे काम केल्यानंतर एक वेगळाच आनंद मिळतो. ही उर्जा वर्षभर टिकते, यामुळे आम्ही दरवर्षी येथे कन्नड घाटात येवून वारकर्यांची सेवा करण्याचा प्रयत्न करतो.
लेवाशक्तिच्या ‘वैष्णवांचा मेळा…वारी पंढरीची’ विशेषंकाचे प्रकाशन
सिध्दीविनायक समुहाच्या लेवाशक्ति मासिकातर्फे पंढरीच्या वारीवर जून महिन्यात ‘वैष्णवांचा मेळा…वारी पंढरीची’ विशेषांक प्रकाशित केला आहे. या विशेषंकाचे प्रकाशन वारीमधील वारकरी व सेवेकरींच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दैनिक जनशक्तिचे निवासी संपादक डॉ.युवराज परदेशी उपस्थित होते. वारकर्यांनी या विशेषंकाचे कौतूक करत लेवाशक्तिच्या पुढील वाटचालीसाठी संस्थापक-संपादक कुंदन ढाके यांना आशिर्वाद व शुभेच्छा दिल्या.