नियोजना अभावी वरणगांवात पाण्याची समस्या ?

(मुबलक पाणी असुनही शहरवासियांना होतोय १२ दिवसाआड पाणी पुरवठा )

वरणगांव |
तापी नदी पात्रात मुबलक पाणी तसेच जल उपसा केंद्रावर अखंडीत विजपुरवठा सुरळीत असुनही केवळ नगर परिषदेच्या नियोजनाअभावी शहरवासीयांना १० ते १२ दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे . यामुळे शहरवासीयांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे .
वरणगांव शहराला सात कि.मी. अंतरावरील तपत कठोरे नजिकच्या तापी नदी पात्रातील पाण्याचा पुरवठा केला जातो .सद्यस्थितीत पंपीग हाऊस जवळील नदीपात्रात मुबलक प्रमाणात पाणी असुन हतनुर धरणातील पाण्याच्या पातळीतही अवकाळी पावसामुळे थोड्या फार प्रमाणात वाढ झाली असून नदीपात्रात कुठल्याही प्रकारची पाणी टंचाई नाही . तसेच पंपीग हाऊसवरील वारंवार खंडीत होणारा विज पुरवठा स्वंतत्र दोन फिडर वरून सुरु करण्यात आला असून एक फिडर वरील विजपुरवठा खंडीत होताच लगेच दुसऱ्या फिडर वरील विज पुरवठा सुरु केला जात असल्याने खंडीत होणाऱ्या विजपुरवठ्याची समस्या कायमस्वरूपी मार्गी लागली आहे . यामुळे पंपीग हाऊस वरून नियमीत पाण्याचा उपसा सुरु असल्याने शहरवासीयांना रोटेशन नुसार किमान आठ दिवसानंतर पाणी मिळणे अपेक्षीत आहे . मात्र, नगर परिषद प्रशासनाच्या नियोजनाअभावी शहरात दहा ते बारा दिवसानंतर पाणी पुरवठा केला जात आहे . यामुळे शहरवासीयांना मुबलक प्रमाणात पाण्याची साठवणूक करावी लागत असल्याने प्रत्येक भागात तिन ते चार तास पाणीपुरवठा सुरु ठेवावा लागतो . परिणामी जलकुंभातील पाण्याच्या पातळीत वाढ होईपर्यंत दुसऱ्या भागातील नागरीकांना किमान आठ ते दहा तासाच्या अंतराने पाणी पुरवठा केला जातो . यामुळे कृत्रिम पाणी टंचाईने त्रस्त झालेले बहुतांश नागरीक आज कुठल्या भागात पाणीपुरवठा झाला याचा कानोसा घेऊन पाण्यासाठी आपल्या कामाचे नियोजन करीत असल्याचे दिसुन येतात . मात्र, नगर परिषद प्रशासनामध्येच नियोजनाचा अभाव असल्याने बहुतांश वेळा पाणीपुरवठा दिर्घ काळापर्यंत लांबणीवर पडत असल्याने नागरीकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे .

पाण्याची होते नासाडी – नियत्रंण समिती कागदावरच

नगर परिषद प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे सात – आठ दिवसानंतर होणारा पाणीपुरवठा १२ दिवसांवर पोहचला आहे . यामुळे शहरातील काही मोठ्या कुटुंबीयांना मुबलक पाण्याची साठवणूक करावी लागत असल्याने त्यांच्याकडुन कर्मचार्‍याला जादा वेळ पाणी पुरवठा सुरु ठेवण्याची विनंती केली जाते . मात्र, याचाच काही नागरीक फायदा घेवून आपल्या घरातील पाणी पूर्ण झाल्यावर उर्वरीत वेळेचे पाणी शौचालयात सोडणे, अंगणात शिंपडणे, बांधकामांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करणे अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी करतांना दिसून येतात . तर दुसरीकडे नविन प्लॉट भागात घर मालकाचा रहीवास सुरु होण्या आधीच त्यांना घरबांधकामांसाठी नळजोडणी करून दिली जात असल्याचेही समोर येत आहे . हा प्रकार भविष्यासाठी घातक असल्याने नगर परिषदेची नव्याने स्थापन केलेली पाणीपुरवठा समिती केवळ कागदोपत्रीच दिसत असुन पाण्याची नासाडी करणाऱ्यांविरुद्ध अद्यापही एकही कारवाई झाली नाही . तसेच नगर परिषदे कडुन पाण्याचा वापर जपून करा या आवाहनाला कर्मचारी व नागरीकांकडुनच वाटाण्याच्या अक्षदा लावल्या जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे .

सहा जलकुंभ असुनही पाण्याची समस्या
शहरात नारी मळा, मकरंद नगर येथे सहा व चार लाख लिटर क्षमतेचे तर विकास कॉलनी, रेल्वे स्थानक परिसर, शिवाजीनगर व सिध्देश्वर नगर भागात प्रत्येकी एक लाख तर ५० हजार लिटर क्षमतेचे जलकुंभ असुन सुद्धा शहरवासीयांसाठी एकच जलशुद्धीकरण केंद्र असल्याने पाण्याची समस्या कायम आहे .