मुंबईच्या अनेक भागांत पाणीटंचाई, अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा
मुंबई | मुंबईतील अनेक भागांत गेल्या काही दिवसांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. कुलाबा, ग्रँट रोड, वरळी, प्रभादेवी, गोराई या भागांत पाणी अतिशय कमी दाबाने येत आहे. जलबोगद्याच्या दुरुस्तीसाठी पालिकेने मुंबईत महिनाभर १५ टक्के पाणीकपातीची घोषणा केली आहे, मात्र अनेक ठिकाणी प्रत्यक्षात पाणीकपात जास्त आहे. पुढचा महिनाभर मुंबईकरांना पाणीटंचाईची झळ सोसावी लागणार आहे.
महापालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या जलबोगद्याला ठाणे येथे कूपनलिकेच्या खोदकामाच्या वेळी धक्का लागला. त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर गळती होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ही गळती दुरुस्त करण्याचे काम शुक्रवार, ३१ मार्चपासून सुरू करण्यात आले. त्यामुळे पालिका क्षेत्रातील पाणीपुरवठय़ात ३० दिवसांसाठी १५ टक्के कपात लागू करण्यात आली आहे. मात्र मुंबईत अनेक भागांत ही पाणीकपात मोठय़ा प्रमाणावर केली जात असल्याच्या तक्रारी रहिवाशांकडून येऊ लागल्या आहेत.
‘पाणीपुरवठय़ावर मर्यादा’
मलबार हिल जलाशयात पाणी पुरेसे नसल्यामुळे कुलाबा, फोर्ट, ग्रँट रोड परिसराला गेल्या काही दिवसांपासून कमी पाणीपुरवठा होत आहे. तर वरळी, प्रभादेवी परिसरातही पाणी कमी येत असल्यामुळे नागरिकांनी विभाग कार्यालयावर मोर्चा नेला होता. पर्यायी वितरण व्यवस्था व भौगोलिक परिस्थिती यांच्या मर्यादा लक्षात घेता पाणीपुरवठय़ावर मर्यादा येत आहेत, असे जल अभियंता विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे मुंबईकरांनी पाणी काटकसरीने वापरून सहकार्य करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.