वरणगावात पाण्याची नासाडी; नगर परिषदेचे दुर्लक्ष

वरणगाव न.प.चा अजब कारभार

विजय वाघ वरणगाव ।

उन्हाळ्याचे दिवस असल्याने शहरातील नागरिकांना नगर परिषदेच्या माध्यमातून पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले जात आहे . मात्र, नगर परिषदेच्या दुर्लक्षीत धोरणांमुळेच शहरात पाण्याची नासाडी होत आहे . यामुळे नगर परिषदेच्या अजब कारभारा विषयी नागरीकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. वरणगांव शहराला ८ कि. मी. अंतरावरील तापीनदी पात्रातून जलवाहीनीद्वारे पाणी पुरवठा केला जातो. मात्र, या जलवाहीनीला वारंवार लागणारी गळती तसेच शहरात नविन पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी टाकण्यात येणाऱ्या जलवाहीनीच्या कामामुळे अनेकांचे जुने घरगुती नळ कनेक्शनची जलवाहिनी फुटत आहे. या फुटलेल्या जलवाहिनीचे कंत्राटदारांच्या मजुरांकडून थातूर – मातुर जोडणी केली जात आहे. परिणामी त्या भागातील पाणीपुरवठा सुरु झाल्यास थातुर – मातुर जोडलेल्या जलवाहीनीला मोठ्या प्रमाणात गळती लागून पाण्याची नासाडी होत आहे.

परिणामी गळती लागलेल्या जलवाहिनीमुळे संबधित घरमालकाला | पाणी मिळणे दुरापस्त झाल्याने आधीच दहा ते बारा दिवसानंतर होणारा पाणीपुरवठा नगर परिषदेच्या हलगर्जीपणामुळे पुरेशा प्रमाणात होत नसल्याने नागरीकांमध्ये | संताप व्यक्त केला जात आहे. याच प्रकारे जुन्या जलकुंभाच्या लगतच्या नारीमळा व परीसरातील पाच ते सहा घरगुती जलवाहिनीला गळती लागल्याने शुक्रवारी (दि. २८) सकाळी ९ वाजेपासुन मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी झाली तर नगर परिषद प्रशासनाकडून उन्हाळ्याचे दिवस असल्याने नागरीकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले जात असतानाच त्यांच्यामुळेच पाण्याची नासाडी होत असल्याने एकीकडे पाण्याची टंचाई तर दुसरीकडे नासाडी होत आहे.