सहावर्षीय निर्जराने सर केला माऊली गडावरील ‘वजीर’ सुळका
Six-year-old Nirjara mahale made ‘Wazir’ cone
जनशक्ती विशेष | शरद भालेराव | नाशिक येथील ‘पॉईंट ब्रेक अॅडव्हेंचर’ या गिर्यारोहक क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेमार्फत आयोजित महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील शहापूरपासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावरील सर्वात उंच शिखर तसेच अति कठीण श्रेणीत गणना होत असलेल्या 90 अशांतील सरळ दगड म्हणजे ‘वजीर’ सुळका 45 मिनिटात यशस्वीपणे सर करण्याची करामत वसई (मूळ रहिवासी आमळगाव, ता. अमळनेर, जि.जळगाव) येथील निर्जरा प्रेमराज महाले या सहा वर्षीय चिमुकलीने करुन दाखविली आहे. तिच्या पराक्रमाचे वसईसह महाराष्ट्रभर कौतुक होत आहे. वजीर सुळकासोबत आशेरी, आसावा, माहुली, तुंगार आणि वसई किल्ला अशा अनेक किल्ल्यांची ट्रॅकिंग तिने आजवर केली आहे.
39 शिवदुर्ग प्रतिष्ठान, 39 घाटकोपरमार्फत असे अनेक उपक्रम आयोजित केले जातात. त्यामार्फत गड-किल्ले संवर्धन केले जाते. निर्जराला तिचे वडील प्रेमराज प्रकाश महाले आणि आजोबा सिद्धार्थ सुमन गुलाबराव बाविस्कर यांचे मार्गदर्शन लाभले. निर्जराचे वडील नोकरी सांभाळुन स्वतः चार वर्षापासून शिवदुर्ग प्रतिष्ठानमार्फत गड-किल्ले संवर्धन मोहीम राबवित असतात. तेही सुट्टीच्या काळात अनेक किल्ल्यांची ट्रॅकिंग करतात. त्यातूनच निर्जराला प्रेरणा मिळाली. तसेच ‘पॉईंट ब्रेक अॅडव्हेंचर’ संस्थेच्या सर्व सदस्यांचे सहकार्य लाभुन तिने वजीर आरोहण मोहीम यशस्वीपणे पार पाडली.
लहान वयातील धाडसाबद्दल तिचे कौतुक
निर्जरा ही अमळगाव येथील प्रकाश तुकाराम महाले, हातेड बु.येथील विजय पुंडलिक सोनवणे, बहुउद्देशीय जनविकास मंडळ संचलित हातेड आश्रमशाळेचे अध्यक्ष राजेंद्र पुंडलिक सोनवणे यांची नात आहे. पालघर जिल्ह्यातील वसई येथील न्यू इंग्लिश स्कूल या शैक्षणिक संस्थेच्या बाल विद्याविहारमध्ये निर्जरा पहिल्या (सेमी इंग्लिश)वर्गात शिक्षण घेत आहे. तिच्या अतिशय लहान वयातील धाडसाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
‘वजीर’ सुळका हा करंगळीच्या आकाराचा आहे. दोरीच्या सहाय्याने हा सुळका पार करतांना कुठलीही भीती वाटली नाही. लहान-लहान मोहिमांना वडिलांसोबत गड संवर्धन केले आहे. त्यामुळे हा सुळका पार करण्याचे मार्गदर्शन त्यांच्याकडून लाभले. यापुढेही विशेष मोहिमांसाठी धाडस करणार आहे.
-निर्जरा प्रेमराज महाले, वसई, जि.पालघर