नवीदिल्ली: एक्झिट पोलने एकतर्फी निकाल दिला असल्याने, या निकालावर आमचा भरोसा नसल्याचे कॉंग्रेसचे जेष्ठ नेते राशीद अल्वी यांनी सांगितले आहे. एक्झिट पोल मध्ये भाजपाला पूर्ण बहुमत मिळणार असल्याचे चित्र समोर आल्याने विरोधी पक्षात खळबळ उडाली असुन, काही नेत्यांनी प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांच्या गाठी भेटी घेणे सुरु केले असल्यचे चित्र पाहण्यास मिळत आहे.एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलतांना त्यांनी हे विधान केले आहे. राशीद अल्वी यांनी राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड मध्ये कॉंग्रेस ने मिळवलेल्या विजयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
जर का एक्झिट पोल प्रमाणे निकाल लागला तर ज्या राज्यांमध्ये कॉंग्रेस जिंकली त्या राज्यात फक्त भाजपचे षडयंत्र होते असा आरोप त्यांनी या वेळी केला. या राज्यात कॉंग्रेसला जिंकून देऊन ईव्हीएमवर जो संशय घेण्यात आलेला होता तो दूर करण्याचा भाजपाचा डाव होता, असे सिद्ध होईल असे राशीद अल्विनी सांगितले.
२०१९च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा एनडीए प्रणीत सरकार येण्याचा अंदाज वर्तवला आहे.एक्झिट पोलमधून राज्यातील जनतेमध्ये भाजपा आणि कॉंग्रेसमध्ये काय वातावरण आहे हे समोर आले आहे. ज्या राज्यात आता कॉंग्रेसची सत्ता आहे त्या राज्यात भाजपाला मोठ्या प्रमाणात फायदा होणार असल्याचे एक्झिट पोल मध्ये दाखवण्यात आले आहे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी एक्झिट पोलच्या आकडेवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून एक्झिट पोलचे आकडे आणि प्रत्यक्ष लागलेला निकाल यात फरक असल्याचे सांगितले होते.