कोलकाता: आज १७ व्या लोकसभेच्या सहाव्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. दरम्यान, मतदानाच्या सहाव्या टप्प्यादरम्यानही बंगालमधील मतदानाला हिंसेचे गालबोट लागले आहे. मतदानाला सुरुवात होण्यापूर्वी बंगालमधील झारग्राम येथे भाजपाच्या एका बूथ कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली आहे. तसेच मरधारा येथील कांठीमध्ये टीएमसीच्या एका कार्यकर्त्याचा संशयास्पदरित्या मृतदेह सापडला आहे. रामोन सिंह असे भाजप कार्यकर्त्याचे नाव आहे. टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी त्याची हत्या केल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आला आहे. तृणमूल काँग्रेस आणि भाजपामध्ये अटीतटीची लढत होत असल्याने बंगालमधील लोकसभेच्या मतदानाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
मरधारा येथील कांठीमध्ये टीएमसीच्या कार्यकर्त्याच्या मृतदेह सापडला आहे. सुधाकर मैती असे या कार्यकर्त्याचे नाव आहे. त्याशिवाय मिदनापूर येथे तृणमूल काँग्रेसच्या दोन कार्यकर्त्यांवर गोळीबार कऱण्यात आला आहे. तसेच बेल्दा येथे तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आला. दरम्यान, बंगालमधील माजी आयपीएस अधिकारी आणि घाटल लोकसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवार भारती घोष यांनी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे. केशपूर येथे तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यानी गैरवर्तन केले, असा आरोप त्यांनी केला आहे.