गाव करी ते राव काय करी

भविष्यातील पाण्याची टंचाई बघता नदी नांगरटी करून, बंधारे बांधून धुरखेडा येते जलसंवर्धनाचे काम

शहादा – पावसाळा सुरू होऊन तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ उलटूनही शहादा तालुक्यात दमदार पाऊस झालेला नाही. ऑगस्ट महिन्यात देखील पावसाचा मोठा खंड पडला आहे. यामुळे भविष्यात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा प्रश्न उद्भवणार आहे. त्याची झळ आपल्या भागात लागू नये म्हणून तालुक्यातील धुरखेडा येथील शेतकऱ्यांनी एकत्र येत स्वखर्चाने गावालगत असलेल्या गोमाई नदीपात्रात ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरटी करून त्यावर लहान-मोठे वाळूचे बंधारे बांधत पाणी पातळी वाढवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

 

गेल्या काही वर्षापासून निसर्गाचा समतोल ढासळल्याने वेळेवर पुरेसा पाऊस पडत नसल्याने बारमाही वाहणाऱ्या नद्या काही काळापुरतेच वाहू लागले आहेत. त्यामुळे सर्वत्र पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागले आहे. जमिनीत पाण्याची पातळी वाढावी यासाठी गोमाई नदीपात्रात नदी नांगरणीच्या प्रयोग काही वर्षांपासून स्वखर्चाने सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे परिसरातील अनेक विहिरी व कुंपणनलिकांना पाणी वाढण्यास मदत झाली आहे. नदीत असलेले खडी, मुरूम खडकाळ जागा नरम झाल्यामुळे पावसात आलेले पाणी अडवून ते नांगरटी केलेल्या भागात हळूहळू सोडल्याने जमीनीत जिरून पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

 

यावर्षी ऑगस्ट महिन्यात पाऊसच नसल्याने मागील अनेक वर्षांपासून सर्वात कमी पाऊस पडलेला हा महिना ठरला आहे. यामुळे पुढील काळात पाऊस न आल्याने पाण्याची मोठी टंचाई निर्माण होत. दुष्काळ पडण्याचे चित्र दिसत आहे. म्हणून शासनाची वाट न बघता तालुक्यातील प्रत्येक नागरिकांनी आपापल्या भागात उपलब्ध असलेले पाणी आणि परतीच्या पावसात येणारे पाणी हे जर आपल्या भागात अडवून जिरवण्यासाठी कृती केली तर पुढील काळात दिसणारे भीषण चित्र बदलण्यासाठी आपला हातभार लागू शकतो. नदीपात्रात सुमारे दीड ते दोन फूट खोल नांगरटी करण्यात येऊन बंधारे निर्माण करण्यात आले आहेत. लोकवर्गणी, नांगरणी करिता ट्रॅक्टर मालकांनी स्वतः व ग्रामस्थांनी डिझेल खर्च करून हा उपक्रम राबवला आहे. या उपक्रमामुळे धुरखेडा, लांबोला, करजई, बुपकरी, डांबरखेडा, भादा यासह परिसरातील शेकडो एकर जमिनीतील कुंपनलीका, विंधन विहिरींच्या पाण्याची समस्या भविष्यात सुटण्यासाठी मदत होणार आहे.

 

पुढील परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती शहादा, विविध सामाजिक संघटना व नागरिक यांच्या वतीने पाणी अडवणे, पाणी जिरवणे पाण्याच्या काटकसरीने वापर करने तसेच जल, जंगल व जमीन संवर्धन उपक्रम तालुक्यात दोन सप्टेंबर पासून सुरू होत आहे. हा उपक्रम एक महिना सुरू राहणार असून यात संपूर्ण तालुक्यात श्रमदानातून जलसंधारणाचे कामे करण्यात येणार आहेत. या आव्हानाला साथ देत शहादा तालुक्यातील धुरखेडा येथील ग्रामस्थांनी एकत्र येत श्रमदानातून मोठे काम उभे केले आहे. तालुक्यातील नागरिक, विविध सामाजिक संघटना, ग्रामपंचायत आदींनी देखील आपल्या भागात जलसंधारणाचे कामे करण्याचे आवाहन धूरखेडा येथील नागरिकांनी केले आहे.

 

फोटो –

 

धुरखेडा येथील गोमाई नदीवर नांगरटी करून बांधण्यात आलेले बंधारे व त्यात होणारे जलसंवर्धनाचे काम

 

प्रतिक्रिया –

 

भविष्यातील पाणीटंचाई बघता सर्वांना एकत्र येत जल संवर्धनाचे काम करावे लागेल. दोन सप्टेंबर पासून जल, जमीन, जंगल संवर्धन या मोहिमेतून संपूर्ण तालुक्यात श्रमदानातून जलसंधारणाचे काम सुरू होणार आहे. धुरखेडा येथील ग्रामस्थांनी एकत्र येत गोमाई नदीमध्ये मोठे काम उभे केले आहे. त्यांचे कार्य कौतुकास्पद असून संपूर्ण ग्रामस्थांचे अभिनंदन करतो. सर्वांनी याप्रमाणे सहभाग नोंदवला तर मोठे काम उभे राहील.

 

अभिजीत पाटील – सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, शहादा

 

नदी नांगरटी करून जमिनीत पाण्याचे प्रमाण वाढते म्हणून आम्ही यासारखे उपक्रम करतो. वाहून जाणारे पाणी आमच्या भागात जिरले तर आमच्या जमिनींना त्याचा फायदा होतो म्हणून यासारखे उपक्रम करत असतो. तालुक्यातील लोकांनी यासारखे उपक्रम केले तर वाहून जाणारे पाणी जिरवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मदत होईल.

 

किशोर चौधरी – ग्रामस्थ धुरखेडा