कारवाईचा धसका घेत व्हॉट्सअॅपने केली जागरूकतेसाठी जाहिरात

0

नवी दिल्ली-देशभरात खोट्या मेसेजेसमुळे हिंसक घटनांमध्ये वाढ होत आहे, त्यावरुन केंद्र सरकारने व्हॉट्स अॅप या लोकप्रीय इन्स्टंट मेसेजिंग अॅप कंपनीला कारवाईचा इशारा दिला होता. त्यानंतर व्हॉट्स अॅपने याची गंभीर दखल घेतल्याचे दिसते आहे. कारण सरकारच्या इशाऱ्यानंतर व्हॉट्स अॅपने पहिल्यांदाच मंगळवारी देशातील मुख्य वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात देऊन नागरिकांना जागरुक करण्याचा प्रयत्न केला आहे.

वर्तमानपत्रांमध्ये दिलेल्या जाहिरातीत व्हॉट्स अॅपकडून खोट्या मेसेजपासून सावध राहण्याच्या 10 टीप्स दिल्या आहेत. तसंच येत्या काही दिवसांमध्ये फेक मेसेजला लगाम लावण्यासाठी एक नवं फीचर आणणार असल्याचंही सांगितलं आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने खोट्या मेसेजला आळा घालण्यासाठी योग्य ती पावलं उचलण्याचे निर्देश व्हॉट्स अॅपला दिले होते. आता वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात देऊन 10 टीप्सद्वारे खोट्या मेसेजपासून कसं सावध राहावं याची माहिती व्हॉट्स अॅपने दिली आहे.

यापूर्वी व्हॉट्स अॅपवर पसरवण्यात येणाऱ्या अफवांना व चिथावणीखोर मेसेजेसना थांबवण्याची जबाबदारी कोणाची असा प्रश्न केंद्र सरकारने  इन्स्टंट मेसेजिंग अॅप कंपनीला विचारला होता. व्हॉट्स अॅपनं यासंदर्भात सरकारकडे खुलासा करत हिंसेच्या अघोरी घटनांनी आम्हीदेखील व्यथित झाल्याचं म्हटलं. तसेच या समस्येवर लगेच काहीतरी तोडगा काढावा अशी आमचीही इच्छा असल्याचं व्हॉट्स अॅपने  सरकारला पाठवलेल्या पत्रात म्हटले होते.