नवी दिल्ली: जगभरासह भारतात कोरोनाने कहर केला आहे. संपूर्ण जगात कोणत्याही देशाला कोरोनावरील लस विकसित करण्यात अद्याप यश आलेले नाही. लसीबाबत अद्याप ठोस काहीही सांगता येत नाहीये. 150 हून अधिक लसींवर जगभरात संशोधन आणि चाचणी सुरू आहे. भारतात कोरोना लसीची 2/3 टप्प्यातील चाचणी सुरू आहे. दरम्यान आज कोरोनावरील लसीबाबत केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ.हर्षवर्धन यांनी मोठे विधान केले आहे. आज रविवारी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन ‘संडे संवाद’ या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी कोरोना लसीसह महत्त्वाची माहिती दिली आहे. जुलै 2021 पर्यंत भारतातील कोट्यवधी लोकांपर्यंत कोरोना लस पोहोचवण्याचा प्रयत्न असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
भारतात ४०० ते ५०० दशलक्ष डोस देण्याची सरकारची योजना आहे. साधारणपणे भारतातील २० ते २५ कोटी लोकांपर्यंत पुढच्या वर्षाच्या जुलै महिन्यापर्यंत ही लस देण्याचे लक्ष्य आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना सर्वात आधी लस दिली जाणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगतिले. कोणत्या लोकांना सर्वात आधी लस दिली जावी, याबाबत राज्यांकडूनही ऑक्टोबरअखेरपर्यंत सूचना मागवल्या असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.