कुंडलीत असेल तेव्हा सरकार बनेल; संजय राऊत

0

मुंबई : राज्यातील सत्ता स्थापनेसाठी भाजपा, सेनेत रस्सीखेच जोरात सुरु आहे. आज राष्ट्रवादी कॉंग्रेसची महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनंतर नवाब मलिक यांनी पत्रकारांना सांगितले की, आम्ही पर्यायी सरकार स्थापनेचा विचार करू. दुसरीकडे आज मुंबईत भाजपची बैठक होणार असून, या बैठकीला अमित शहा उपस्थित राहणार आहे. शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडून बसली आहे. दरम्यान शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्राच्या कुंडलीत असेल तेव्हा सरकार बनेल असे म्हटले आहे. पत्रकारांनी राऊत यांना सरकार कधीपर्यंत स्थापन होईल असा प्रश्न विचारला असता त्यांनी असं म्हटलं आहे.

तसेच, भाजपाने ठरल्याप्रमाणे मागण्या मान्य कराव्यात. मुख्यमंत्र्यांनी शब्द फिरवल्याने बैठक रद्द करण्यात आली. आज चर्चा झाली नाही, उद्याच काही निश्चित नाही. जर मुख्यमंत्री काही ठरलेच नाही, म्हणत असतील तर चर्चा करण्याचा काय फायदा, असा सवाल यावेळी संजय राऊत यांनी केला. याशिवाय, शिवसेनेचे 56 पैकी 45 आमदार आमच्या संपर्कात असल्याचे विधान भाजपाचे राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी केल्यामुळे खळबळ उडाली. याला उत्तर देताना संजय राऊत यांनी संजय काकडे नक्की भाजपाचे आहे का? असा सवाल उपस्थित केला.

दरम्यान, मुख्यमंत्रिपदाबाबत कोणताही समझौता होणार नसल्याचा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला दिला आहे. अडीच वर्षांचे मुख्यमंत्रिपद देऊ, असे कधीच कबूल केले नव्हते. 1995चा फॉर्म्युला येईल वगैरे असे काहीही होणार नाही, मुख्यमंत्रीपदासाठी प्रस्ताव आला होता, पण अशी कुठलीही बातचीत झाली नाही, असे अमित शहांनीही मला सांगितल्याचा खुलासा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजपामधली धूसफूस आणखी वाढली आहे.