निवडून आल्यावर शांत बसू नका पक्षवाढीसाठी फिरा!

0
 शरद पवार यांनी आदेश दिल्याची खासदार मधुकर कुकडे यांची माहिती 
 मुंबई  :– आपण निवडून आलात त्याबद्दल तुमचं अभिनंदन…निवडून आल्यानंतर शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले पाहिजेत…ज्या शेतकऱ्यांनी निवडून दिलं त्यांच्या विकासासाठी लक्ष द्या…राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पूर्ण विचाराने पुढे गेला पाहिजेत. निवडून आल्यावर शांत बसू नका पक्षवाढीसाठी फिरा असे आदेश पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्याची माहिती भंडारा-गोंदियाचे नवनिर्वाचित खासदार मधुकर कुकडे यांनी मिडियाशी बोलताना दिली.
सोमवारी, खासदार मधुकर कुकडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईत भेट घेत त्यांचे आर्शिवाद घेतले. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. ही निवडणूक खरंच टफ होती. परंतु आमचे खासदार प्रफुल्ल पटेल, काँग्रेस नेते नाना पटोले यांच्यामुळे ही निवडणूक सोपी झाली.
 यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना खासदार मधुकर कुकडे यांनी सर्वप्रथम सिंचनाचा विषय हाती घेणार आहे. आम्हाला भातशेतीला पाणी,वीज हवी आहे. आरोग्य सुविधा या सरकारने नीट दिलेल्या नाहीत. भाताची निर्यात न झाल्यामुळे भाताच्या धानाला भाव नाही त्यामुळे गोंदिया जिल्हयामध्ये पूर्ण युनिट बंद आहे . जवळजवळ २५ हजार कामगार बेकार झाले आहेत. शरद पवारसाहेब कृषीमंत्री असताना त्यांनी भात निर्यात धोरण राबवले त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. मात्र या सरकारने निर्यात बंद केल्यामुळे शेतकऱ्यांचे हाल झाले आहेत. शरद पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली पुन्हा चांगले दिवस आणण्यासाठी प्रयत्न करु असे सांगतानाच पक्षातील नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपला पुन्हा उभारी घेवू देणार नाही असे आव्हानही खासदार मधुकर कुकडे यांनी यावेळी दिले.