शिवसेनेची स्वबळाची भाषा कुठे गेली?

0

रत्नागिरी – शिवसेना ही दुटप्पी असून शिवसेनेची भूमिका नेहमीच धरसोड पद्धतीची राहिली आहे. आताच्या विधान परिषद निवडणुकीत शिवसेना भाजपची युती झाल्यात जमा आहे. एकीकडे पक्षाच्या अधिवेशनात स्वबळाची भाषा करणाऱ्या शिवसेनेचे स्वबळ आता गेले कुठे? असा सवाल सुनिल तटकरे यांनी उपस्थित केला. आज कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला, त्यावेळी तटकरे बोलत होते.

कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनिकेत तटकरे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. अनिकेत हे सुनिल तटकरे यांचे चिरंजीव आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, आमदार संजय कदम, खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांच्यासह रत्नागिरी रायगडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक यावेळी चुरशीची होणार आहे. शिवसेनेकडून राजीव साबळे यांनी बुधवारी आपला अर्ज दाखल केला. त्यानंतर आज अनिकेत तटकरे यांनी शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. गेली दोन टर्म कोकण स्थानिक स्वराज्य मतदार संघावर राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. दरम्यान, यावेळी आम्ही हॅटट्रीक करू, असा विश्वास राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केला.