नवी दिल्ली- मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोरम या पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीची काल मतमोजणी झाली. छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये १५ वर्षांनंतर काँग्रेस सत्तारूढ होणार आहे. राजस्थानमध्येही काँग्रेस अपक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन करेल. दरम्यान राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच सुरु आहे. राजस्थानचा नवीन मुख्यमंत्री म्हणून युवा चेहरा असलेले सचिन पायलट आणि अनुभवी चेहरा माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यात स्पर्धा आहे. दरम्यान आज कॉंग्रेसची बैठक होणार असून मुख्यमंत्री कोण होणार हे निश्चित होणार आहे.
दोघांची बाजू भक्कम
राजस्थानमध्ये सचिन पायलट आणि अशोक गेहलोत हे दोन्ही नेते आपापल्या प्रभागांत लोकप्रिय आहेत. राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदासाठी अशोक गेहलोत यांनी जोरदार मोर्चेबांधणी चालवली आहे. सचिन पायलट आणि अशोक गेहलोत हे दोघेही स्वतःच्या विभागातून चांगल्या मताधिक्क्यांनी निवडून आले आहेत. त्यामुळेच दोघांचाही मुख्यमंत्रिपदावर दावा आहे. सचिन पायलट हे काँग्रेसचे तरुण नेतृत्व आहे. त्यांनी राज्यात पक्षाला चांगली उंची मिळवून दिली आहे. त्यांच्या नेतृत्वात पक्षाने अजमेर आणि अलवर या दोन्ही लोकसभा पोटनिवडणुकीत विजय मिळवला होता. गेहलोत यांनी यापूर्वीही राजस्थानचे मुख्यमंत्रिपद सांभाळले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीही गेहलोत यांनी मुख्यमंत्री कोणाला बनवायचं हे राहुल गांधी ठरवतील, असे म्हटले होते. त्यामुळे राहुल गांधी स्वतःचे तरुण साथीदार असलेल्या पायलट यांच्या मुख्यमंत्रिपदाची कमान सोपवतात का, की गेहलोत यांना पुन्हा संधी देतात हे काही दिवसांतच स्पष्ट होणार आहे.
मध्य प्रदेशमध्ये देखील स्पर्धा
मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ आणि ज्योतिरादित्य सिंधिया हे दोन्ही नेते मुख्यमंत्रिपदावर दावा करत आले आहेत. कमलनाथ यांच्याकडे काँग्रेस नेतृत्व मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्याची जास्त शक्यता आहे. राहुल गांधी यांनी मध्य प्रदेश निवडणुकीपूर्वीच कमलनाथ यांना प्रदेशाध्यक्ष बनवले होते, तर मुख्यमंत्रिपदाचे दुसरे दावेदार ज्योतिरादित्य सिंधियांना कॅम्पेन कमिटीचे अध्यक्षपद दिले होते. परंतु मध्य प्रदेशमध्ये ज्योतिरादित्य सिंधियांपेक्षा कमलनाथ यांचे वजन जास्त आहे. त्यांच्या प्रचार यंत्रणेतील सक्रिय सहभागामुळेच काँग्रेसला मध्य प्रदेशात एवढे मोठे यश मिळाल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे राहुल गांधी मुख्यमंत्रिपद कमलनाथ यांच्याकडे सोपवण्याची शक्यता आहे.
छत्तीसगडमध्ये चार नावांची चर्चा
छत्तीसगडमध्ये काँग्रेसच्या मुख्यमंत्रिपदासाठी चार नावांची चर्चा आहे. या भुपेश बघेल अग्रस्थानी आहे. दुसरे नाव टी. एस. सिंहदेव, तिसरे नाव ताम्रध्वज साहू चौथे नाव चरण दास महंत यांचे आहे. बहुसंख्याक समाजातील नेत्यांना ते मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा आहे.