अत्याचार व खूनाच्या तपासात घरझडतीत शस्त्रेही सापडली होती ; रामानंदनगर पोलिसात होता गुन्हा दाखल
जळगाव- समतानगरातील बालिका अत्याचार व खूनप्रकरणी तपासादरम्यान रामानंदनगर पोलिसांना संशयित आदेशबाबा यांच्या घरात बिबट्याची कातडी, तसेच हरणाची दोन शिंगे सापडली तसेच गुप्ती व चाकू अशी शस्त्रे सापडली होती. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात आर्म अॅक्ट तसेच वन्यजीव संरक्षण कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्यात संशयित आनंदा तात्याराव साळुंखे उर्फ आदेशबाबा यास न्यायालयाने प्रत्येक कलमात तीन वर्ष सक्तमजुरी व 10 हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. न्या. सी.व्ही. पाटील यांच्या न्यायालयाने मंगळवारी हा निकाल दिला. खटल्यात आदेशाबाबाला पुणे येथील येरवडा जेलमधून व्हिडीओ कॉन्फरन्सने हजर होता.
रामानंदनगर पोलीस ठाण्यात बालिका अत्याचार व खूनप्रकरणी दाखल गुन्ह्यात संशयित आदेशबाबा यास अटक करण्यात आली होती. 13 मे 2018 रोजी या तपासात तपासअधिकारी पोलीस निरिक्षक बापू रोहम यांना घरझडतीत आदेशबाबाच्या राहत्या घरात बिबट्याची कातडी, हरणाची दोन शिंगे यासह गुप्ती तसेच चाकू ही शस्त्र सापडली होती. याप्रकरणी पोलीस निरिक्षक बापू रोहम यांनी फिर्यादी होवून आदेशबाबा विरोधात रामानंदनगर पोलिसात 3029/2018 भादवि 4/25 आर्म अॅक्ट तसेच वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 कलम (31) (36) 9, 39,44,49 (अ)(ब) याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आदेशबाबा पुण्याहून व्हिडीओ कॉन्सरन्सने हजर
तपासाअंती जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होेते. मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती न्या.सी.व्ही.पाटील यांच्या न्यायालयात हा खटला चालला. यात सरकारपक्षातर्फे तपासअधिकारी यांच्यासह सहा साक्षीदार तपासण्यात आले होते. साक्षीदारांचा पुरावा सुसंगत असल्याने त्यानुसार संशयित आदेशबाबाला दोषी धरण्यात आले होते. मंगळवारी खटल्यात शिक्षेवर कामकाज झाले. यात श्रीमती न्या.सी.व्ही.पाटील यांनी आदेशबाबास आर्म अॅक्ट व वन्यजीव संरक्षण कायदा अशा दोन्ही कलमांमध्ये प्रत्येकी 3 वर्ष सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकारपक्षातर्फे अॅड.आर.पी.गावीत यांनी काम पाहिले. अत्याचार व खुनाच्या गुन्ह्यात आदेशबाबा यास मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली असून पुणे येथील येरवडा कारागृहात तो शिक्षा भोगत आहे. या खटल्यात तो पुण्याहून व्हिडीओ कॉन्फरन्सने हजर होता. त्यावर शिक्षेबद्दल विचारणा करण्यात आली असल्याचेही अॅड. गावीत यांनी सांगितले.