मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीची निकाल काल (१३ मे) लागला. या निवडणुकीत काँग्रेसने भाजपाचा दारूण पराभव केला. यावर अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया आल्या. दरम्यान, आता महाराष्ट्र नवनर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
राज ठाकरे म्हणाले की, मी मागे माझ्या भाषणात म्हटलं होतं की, विरोधी पक्ष हा जिंकत असतो, तर सत्ताधारी हरत असतात. मला वाटतं हा पराभव स्वभावाचा पराभव आहे, वागणुकीचा पराभव आहे. आपलं कोण वाकडं करू शकतो अशा विचाराचा जो असतो त्याचा हा पराभव आहे.
कर्नाटक निकालाचा महाराष्ट्रावर परिणार होणार का? असा प्रश्न विचारला असता राज ठाकरे म्हणाले की, जनतेला, लोकांना कधीही गृहीत धरू नये, हा बोध या निकालातून सर्वांनी घ्यावा. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून महाराष्ट्रातील निकालाबाबत लगेच सांगता येणार नाही.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल
कर्नाटक विधानसभेच्या २२४ पैकी १३५ जागांवर काँग्रेस पक्ष विजयी ठरला असून काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केला आहे. तर सत्ताधारी भाजपाला केवळ ६५ जागांवर समाधान मानावं लागलं आहे. जनता दल (सेक्युलर) पक्षालाही साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१८ विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत जेडीएसची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. जेडीएसला केवळ १९ जागा जिंकता आल्या.