गृहनिर्माण क्षेत्रात तेजीचे वारे..
दसऱ्याला टू, थ्री, बीएचकेच्या घरांना ग्राहकांची सर्वाधिक पसंती…
पिंपरी :- गृहनिर्माण क्षेत्रात तेजीचे वारे असून, सप्टेंबर महिन्यात १६ हजार ४२२ घरांची विक्री झाली. तर ऑक्टोबर महिन्यात नवरात्रीचे नऊ दिवस व दसऱ्याच्या दिवशी पिंपरी चिंचवड शहरामध्ये स्वप्ननातील घर घेण्याचे स्वप्न अनेक नागरिकांनी पूर्ण केले आहे. या दहा दिवसांमध्ये ५ हजार नागरिकांनी वन, टू, थ्री बीएचके घर बुक केले आहे. नागरिकांकडून ५० लाख ते १ कोटीपर्यंतच्या घरांना सर्वाधिक पसंती मिळत असल्याचे बांधकाम व्यावसायिकांनी सांगितले.
मागील वर्षीच्या तुलनेत घरांच्या विक्रीत ६५ टक्के वाढ नोंदविण्यात आली. घरांच्या विक्रीतून सरकारला शहरातून सर्वाधिक मुद्रांक शुल्क मिळाले. सर्वाधिक मागणी परवडणाऱ्या घरांना दिसून आली.
पिंपरी चिंचवड शहरात प्रचंड वेगाने गृहप्रकल्पांची कामे सुरू असून टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. शहरामध्ये मोठे टॉवर्स उभे राहत असून बहुमजली गृहसंकुलांचेही प्रमाण वाढले आहे. पिंपळे सौदागर, वाकड, थेरगाव, पुनावळे, चऱ्होली, डूडूळगाव, मोशी या भागात असलेल्या चांगल्या सुविधा व कनेक्टिव्हिटीमुळे नागरिकांकडून या भागात घर खरेदीला सर्वाधिक पसंती आहे.
यंदा नवरात्र व दसऱ्याच्या मूहर्तावर बांधकाम व्यावसायिकांकडून अनेक आकर्षक ऑफर्सची घोषणा करण्यात आली होती. त्यामध्ये शून्य स्टॅम्प ड्युटी तसेच बुकिंगवर इलेक्ट्रॉनिक वस्तू, स्कूटर, सोने-चांदीचे नाणे यांचा समावेश होता. त्याला ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. मल्टिपल स्विमिंग पूल, किड्स प्ले एरिया, जिम्नॅशियम, मिनी थिएटर, गार्डन क्लब हाऊस, पोडियम पार्किंग, लार्ज ओपन स्पेस, टेरेस पोडियम ॲमिनिटीचेही आकर्षण गृहखरेदी करण्यासाठी येणाऱ्यांना होते.