पोलीस अधीक्षकांनी तिघां पोलिसांना मंगळवारी केले तडकाफडकी निलंबित ; मारहाणीविरोधात एमआयडीसी पोलिसात होता गुन्हा दाखल
जळगाव- खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींसोबत प्रौढाला मारहाण केल्याच्या प्रकरणात अटक केलेला हवालदार मुकेश आनंदा पाटील, सुरेश श्रीराम सपकाळे व कॉ.गोरख हिंमतराव पाटील या तिघांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. मुकेश याचा गुन्ह्यात सक्रीय सहभाग तर सुरेश सपकाळे व गोरख पाटील हे चिंग्याला सोडून घरी गेल्याने दोघांना कर्तव्यात हलगर्जीपणा करुन दुर्लक्ष करणे चांगलेच भोवले आहे. दरम्यान, या तिनही निलंबित कर्मचार्यांना मुख्यालय पोलीस मुख्यालय देण्यात आले आहे.
अखेर संशयितांची नाशिक कारागृहात रवानगी
गोसावी यांना ज्या कारमध्ये डांबून ठेवण्यात आले, ती कार (क्र.एम.एच.19 सी.यु.8500) पोलिसांनी जप्त केली आहे. या कारचा मालक कोण? चिंग्याजवळ ही कार कशी आली याची चौकशी आता पोलीस करीत आहेत. कारागृहात असताना चिंग्या याच्यावर याआधी देखील गुन्हा दाखल झालेला आहे. रविवारी न्यायालयाने अटकेतील तिनही पोलिसांची पोलीस कोठडीचा हक्क राखून कारागृहात रवानगी केली, मात्र सायंकाळी कारागृह प्रशासनाने पोलिसांना येथील कारागृहात ठेवण्यास मनाई करुन नाशिक कारागृहात पाठविण्याचा सल्ला दिला. रात्री उशिरापर्यंत पोलीस व कारागृह प्रशासन यांच्यात वाद सुरु होता. शेवटी तिघांना मध्यरात्री नाशिक कारागृहात पाठविण्यात आले. याच प्रकरणाशी संबंधित गुन्हेगार चिंंग्या व लखन मराठे या कारागृहात आहेत.
गुन्ह्यात कलम वाढविले
एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात आणखी 364 हे खून करण्याच्या उद्देशाने अपहरण केल्याचे कलम वाढविण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी दिली. दरम्यान, चिंग्या आतापर्यंत किती वेळा न्यायालयात तारखेवर आला व किती वेळा जिल्हा रुग्णालयात दाखल झाला. त्या-त्यावेळी कोणत्या कर्मचार्याची गार्ड ड्युटी होती याचीही चौकशी केली जात आहे. 13 रोजी गार्ड ड्युटीला एकुण किती कर्मचारी होते, त्यांचीही चौकशी केली जात असल्याची माहिती मिळाली आहे.
सक्तीच्या सेवानिवृत्तीचा त्या कर्मचार्याला ‘उतारा’
पोलीस मुख्यालयात कार्यरत पोलीस कर्मचारी अशोक पटवारी हे मद्यप्राशन करुन कर्तव्य बजावत असल्याच्या तक्रारी वरिष्ठांकडे गेल्या काही दिवसांपासून होत्या. त्याबाबत विभागीय चौकशी करण्यात आली विभागीय चौकशीत दोष निष्पन्न झाल्याने पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी पटवारी यास खात्यातून सक्तीची सेवानिवृत्तीचे आदेश देवून कारवाई केली आहे.