औरंगाबाद । प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जनसामान्यांच्या कल्याणाचा विचार करून महत्त्वाकांक्षी अशी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना देशात लागू केली. या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 3 कोटी 90 लाखाहून अधिक महिलांना मोफत गॅस जोडणीचा लाभ देण्यात आला आहे. या योजनेचा प्रत्येक पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
औरंगाबादेत मोफत गॅस जोडणी वितरण समारंभ
मिलिंद महाविद्यालयाच्या प्रांगणावर आयोजित प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत मोफत गॅस जोडणी वितरण कार्यक्रमात श्री.आठवले बोलत होते. यावेळी खासदार चंद्रकांत खैरे, बाबुराव कदम, मिलिंद शेळके, इंडियन ऑइलचे मुख्य परिक्षेत्र व्यवस्थापक सी. नागेश्वर, मिलिंद दाभाडे, नागराज गायकवाड, किशोर थोरात, राजेश काळे, अशोक सायन्ना, मिलिंद पाटील, सचिन कांबळे यांची उपस्थिती होती. श्री.आठवले यांच्याहस्ते प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून प्रातिनिधिक स्वरूपात 20 लाभार्थ्यांना मोफत गॅस जोडणीचा लाभ देण्यात आला. यावेळी श्री.खैरे यांनीही तक्ष गॅस एजन्सीला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवराय, बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तींचे पुष्प अर्पण करून श्री.आठवले यांनी पूजन केले. प्रास्ताविक चेतन कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन राजाभाऊ सिरसाट यांनी केले. शेवटी अजय देहाडे, चेतन चोपडे, कुणाल वराळे प्रस्तुत ‘तुझ्या पाऊलखुणा’ हा भीमगीतांचा कार्यक्रम पार पडला.