आशिया कपमध्ये भारताच्या महिला संघाने पाकिस्तानचा उडविला धुवा

0

मलेशिया : मलेशियात सुरु असलेल्या आशिया कपमध्ये भारताच्या महिला संघाने पाकिस्तानवर सात विकेट्सने विजय मिळवला. या विजयाने भारताने फायनलमध्ये धडक दिली. पाकिस्तानचे ७३ धावांचे माफक आव्हान भारताने ३ विकेट्सच्या मोबदल्यात गाठले. एकता बिष्टने तीन विकेट घेत भारताच्या विजयात मोलाचे योगदान दिले.

प्रथम नाणेफेक जिंकून पाकिस्तानने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानची सलामीची जोडी फक्त १ धावांवार फोडण्यात भारताला यश आले. नैन अबिदी भोपळा न फोडताच माघारी परतली. शिखा पांडेने तिची विकेट घेतली. यानंतर कोल्हापूरच्या अनुजा पाटीलने कर्णधार बिसमाह मारुफची विकेट घेत पाकला दुसरा धक्का दिला. यानंतर एकता बिष्टने अचूक मारा करत पाकिस्तानच्या फलंदाजांना स्वस्तात माघारी पाठवले. पाकिस्तानला २० षटकांत ७ विकेट्स गमावून फक्त ७२ मजल मारता आली. एकता बिष्टने ४ षटकांत १४ धावा देऊन ३ विकेट घेतल्या. शिखा पांडे, अनुजा पाटील, पुनम यादव आणि दिप्ती शर्माने प्रत्येकी एक विकेट घेतली.

पाकिस्तानचे ७३ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारताची सुरुवातही चांगली झाली नाही. सलामीवीर मिताली राज शून्यावरच बाद झाली. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेली दिप्ती शर्मा शून्यावरच तंबूत परतली. यानंतर स्मृती मंधानाने (३८ धावा) कर्णधार हरमनप्रित कौरच्या (नाबाद ३४ धावा) साथीने भारताला विजयाच्या समीप नेले. संघाच्या ७० धावा झाल्या असताना मंधाना बाद झाली. पण तोवर भारताचा विजय निश्चित झाला होता. यानंतर कर्णधार हरमनप्रितने भारताला सहज विजय मिळवून दिला. फायनलमध्ये भारताचा सामना बांगलादेश विरुद्ध मलेशिया या सामन्यातील विजेत्या संघाशी होणार आहे.