महिला मंडळ शाळेत प्रवेशोत्सव साजरा

चोपडा (प्रतिनिधी)

येथील भगिनी मंडळ संचलित महिला मंडळ माध्यमिक विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२३-२४ च्या प्रथम दिवशी प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आकर्षक फुलांनी आणि फुग्यांनी सजवलेले प्रवेशद्वार, विद्यालयाच्या आवारात काढलेल्या रांगोळ्या, पताका आणि फुग्यांनी सजवलेले वर्ग, प्रचार फेरी, शाळेतील मुलांचे व त्यांच्या पालकांचे गुलाब पुष्प आणि पेन देऊन केलेले स्वागत, नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे औक्षण, मध्यान्ह भोजनात मिष्टान्न वाटप, पहिल्याच दिवशी वितरित केलेली नवी कोरी पुस्तके, शैक्षणिक साहित्याचे वाटप हे आजच्या प्रवेशोत्सवाचे वैशिष्ट्य ठरले. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील ओसडणारा उत्साह व आनंद शाळेच्या वातावरणाला भारावणारा होता.

शाळेच्या प्रवेशोत्सवानिमित्त झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकारी डॉ. भावना भोसले या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे समन्वयक तथा उपप्राचार्य डॉ. आशिष गुजराथी यांच्यासह पालक शिक्षक संघाचे प्रतिनिधी संतोष माळी, प्रल्हाद माळी, बेबीबाई बाविस्कर, मुख्याध्यापक सुनील चौधरी पर्यवेक्षक सुनील पाटील हे मंचावर उपस्थित होते. यावेळी डॉ. भावना भोसले यांनी मनोगत व्यक्त करतांना शाळेने राबवलेल्या विविधांगी शालेय व सहशालेय उपक्रमांचे कौतुक केले व विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांच्या शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. प्रवेशोत्सव कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका कविता देशमुख यांनी तर प्रास्ताविक मुख्याध्यापक सुनील चौधरी व आभार प्रदर्शन संजय बारी यांनी केले. यावेळी शिक्षकांसह विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.