ज्ञानाप्राप्ती साठी कठोर मेहनत करा यश तुमच्या जवळ चालत येईल…!
(भुसावळ ) “विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो जीवनात एक यशस्वी माणूस व्हायचं असेल तर जीवनाची दिशा निश्चित करा. ध्येय ठरवून ध्येय पूर्तीसाठी ज्ञान मिळवा.ज्ञानप्राप्ती साठी कठोर मेहनत व परिश्रम करा . यश तुमच्या जवळ चालत येईल.” असे प्रतिपादन प्रा. डॉ. जयेंद्र लेकुरवाळे यांनी केले. ते प्रागतिक विचार मंच आणि डॉ. मानवतकर बहूउद्देशिय संस्था, भुसावळ यांनी आयोजित केलेल्या “गौरव यशवंतांच्या “कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.भुसावळ तालुक्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधून दहावी -बारावीच्या परीक्षेत अनु. जाती मधून प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव यशवंतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
भुसावळ येथील नाहाटा महाविद्यालययाच्या सभागृहात आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानज्योती विद्यालयाचे प्राचार्य सुनील भिरूड सर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. राजेश मानवतकर, डॉ. मधु मानवतकर, अहिरराव मॅडम आदी मान्यवर होते.
या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना प्रा. डॉ. जयेंद्र लेकुरवाळे पुढे म्हणालेत की,”विद्यार्थी मित्रांनो उंच स्वप्न पहायला शिका. परिस्थिती पेक्षा मनस्थिती मजबूत करा. मनस्थिती मजबूत असली की यश मिळविणे सोपे जाते. दहावी आणि बारावीच्या परीक्षा पास होऊन तुम्ही आता तुमच यश आणि गुणवंता सिद्ध केली आहे. ती या पुढील शिक्षणात सतत वाढवत ठेवा. प्रज्ञासूर्य डॉ. आंबेडकरांचे जीवन चरित्र वाचा संकटांना कसे पराभूत करतात त्याची सत्य कहाणी तुम्हास कळेल.”
या प्रसंगी डॉ. राजेश मानवतकर यांनी ही यशवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना भावी शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्यात.
अध्यक्षीय समारोप करतांना प्राचार्य सुनील भिरूड म्हणालेत की “विद्यार्थ्यांनो ग्रंथालय व ज्ञानी माणसे यांच्या सहवासात जा. ग्रंथसारखे ज्ञान देणारे दुसरे गुरु नाहीत. ग्रंथालये आपले ज्ञान भांडार समवृद्ध करतात. आज जगाची श्रीमंती पैशावर मोजली जात नाही तर तुमच्या जवळ असलेल्या ज्ञान भांडारावरती मोजली जाते. ज्ञाना शिवाय जीवन व्यर्थ आहे. त्या साठी महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब, कर्मवीर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन वाटचाल करा. एक आदर्श माणूस व्हाल “.
कार्यक्रमाचे स्वागतगीत सौ.मोनल बाऱ्हे, लिन्मय बाऱ्हे यांनी सादर केले तर प्रास्ताविक प्रा. प्रशांत नरवाडे यांनी केले. सूत्रसंचालन विनोद बाऱ्हे सर यांनी केले. आभार प्रदर्शन देवेंद्र तायडे यांनी मांडले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रागतिक विचार मंचचे अध्यक्ष जे. पी. सपकाळे सर, डॉ. मधू मानवतकर , प्रा. जतिन मेढे, दिलीप सुरवाडे, प्रा. प्रशांत नरवाडे, समाधान जाधव, देवेंद्र तायडे, संघरत्न सपकाळे, वाल्मिक देहाडे, मुकेश सोनवणे, निलेश रायपुरे, आर. आर धनगर, संजू भटकर,अनिल बागुल, रवींद्र अडकमोल आदींनी परिश्रम केले. भुसावळ शहर व तालुक्यातून १७५ विद्यार्थ्यांचा त्यांच्या आई -वडिलांसोबत मान्यवरांच्या हस्ते गौरवपत्र व ग्रंथ भेट देऊन गौरव करण्यात आला .