रशिया-ख्रिस्तियानो रोनाल्डोला युव्हेंटस क्लबने मोठय़ा रकमेला खरेदी केल्याबद्दल इटलीमधील फियाट ख्रिसलर ऑटोमोबाइल्स कंपनीच्या कामगारांनी निषेध व्यक्त केला असून त्याविरोधी आंदोलन सुरू केले आहे. १५ आणि १७ जुलै रोजी ते संपावर जाणार आहेत. रोनाल्डोकरिता अब्जावधी रक्कम खर्च करण्यापेक्षा कंपनीने हीच रक्कम नव्याने रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी खर्च केले असते तर फायदा झाला असता असे सांगितले आहे. केवळ एखाद्या खेळाडूसाठी एवढी गुंतवणूक करणे योग्य नाही असे या कामगारांचे नेते लॅव्हेरो प्रिव्हाटो यांनी म्हटले आहे. अॅग्नेली हे युव्हेंटस संघाचे मालक आहेत.
क्रोएशियाने विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारल्यामुळे देशाचे पंतप्रधानही सध्या भलतेच खूश आहेत. आंद्रेज प्लेनकोव्हिच आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने गुरुवारी एका सत्रासाठी चक्क क्रोएशिया संघाची लाल व पांढऱ्या रंगाची जर्सी परिधान करून अंतिम फेरीसाठी आपल्या संघाला शुभेच्छा दिल्या.
‘आयफेल टॉवर’ रविवारी बंद
विश्वातील लोकप्रिय प्रेक्षणीय स्थळ म्हणून लौकिक असलेले पॅरिसमधील आयफेल टॉवर रविवारी होणाऱ्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यादरम्यान बंद ठेवण्यात येणार आहे. अंतिम लढतीचा चाहत्यांना मोठय़ा पडद्यावर आनंद लुटता यावा, यासाठी आयफेल टॉवरजवळील ‘चँप डी मार्स’ पार्क येथे सोय करण्यात आली असून त्याकरिता या ऐतिहासिक वास्तूला धोका उद्भवू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
मेक्सिकोमध्ये १९७०मध्ये झालेली स्पर्धा आजही सर्वाधिक गाजलेली स्पर्धा म्हणवली जाते. शतकातले काही अविस्मरणीय सामने या एकाच स्पर्धेत झाले. उपांत्यपूर्व फेरीत तत्कालीन विजेत्या इंग्लंडविरुद्ध जर्मनी ०-२ असे पिछाडीवर पडले होते. पण दुसऱ्या हाफमध्ये दोन गोल करून जर्मनीनं बरोबरी साधली आणि अतिरिक्त वेळेत गोल करून सामना जिंकला. उपांत्य फेरीचा जर्मनी-इटली हा सामना तर ‘शतकातील लढत’ म्हणून मान्यता पावला. इटलीनं आठव्याच मिनिटाला आघाडी घेतली. जर्मनीनं सामना संपण्यास काही सेकंद शिल्लक असताना गोल करून बरोबरी साधली. अतिरिक्त वेळेत पाच गोलांची बरसात झाली, जो अतिरिक्त वेळेसाठी आजही विक्रम ठरतो. दोन्ही संघ आघाडी घेत राहिले, पण अखेरीस इटलीनं ४-३ अशी बाजी मारली. ही स्पर्धा प्रथमच रंगीत टीव्हीवर दाखवली गेली. पेलेच्या आविष्कारामुळे ब्राझील तिसऱ्यांदा जगज्जेते बनले आणि त्याबद्दल ज्यूल्स रिमेट चषक त्यांना ब्राझीलमध्येच ठेवण्याची मुभाही मिळाली. ६०-७०च्या काळातील अत्यंत चांगल्या दर्जाचा फुटबॉलचा खेळ या स्पर्धेत पाहावयास मिळाला.