नवीन राष्ट्रीय शिक्षणिक धोरणसंदर्भात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात कार्यशाळा

जळगाव प्रतिनिधी ।

कला वाणिज्य व विज्ञान शाखेतील पदवी व पद्व्युत्तर अभ्यासक्रमांना येत्या सन २०२३ २४ या शैक्षणिक वर्षापासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्याच्या तयारीवर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात गुरूवारी झालेल्या कार्यशाळेत सर्वांगीण चर्चा करण्यात आली. येत्या महिन्याभरात शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांपर्यंत या धोरणाविषयीची जागरूकता निर्माण करण्यासाठी सर्व प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

विद्यापीठाच्या सिनेट सभागृहात गुरूवारी दिवसभर नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर विद्यापीठाशी संलग्नित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयांचे सर्व प्राचार्य, संचालक, अधिष्ठाता, अभ्यास मंडळांचे अध्यक्ष, अधिसभा सदस्य

यांची कार्यशाळा घेण्यात आली. अंतर्गत गुणवत्ता निर्धारण कक्षाच्या वतीने ही कार्यशाळा झाली. शासनाने या धोरणासंदर्भात गठीत केलेल्या समितीचे सदस्य कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी सेवानिवृत्त प्राचार्य अनिल राव, मुंबई विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू प्रा. आर. डी. कुलकर्णी यांनी पहिल्या सत्रात सविस्तर मार्गदर्शन केले. व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्नवरे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांची यावेळी उपस्थिती होती. प्रारंभी अधिष्ठाता प्रा. अनिल डोंगरे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी कला वाणिज्य व विज्ञान शाखेसाठी शैक्षणिक धोरणाचा आराखडा कसा असेल यावर पॉवरपॉइंट सादरीकरण केले. त्यानंतर खुल्या चर्चे त प्राचार्य अनिल राव, प्रा. आर.डी. कुलकर्णी आणि प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी सहभाग घेवून उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले..

» या धोरणाची अंमलबजावणी करतांना ज्या समस्या निर्माण होतील त्यावर तोडगा काढला जाईल. वर्कलोड मध्ये थोडा फरक पडेल. पारंपारिक विचार न करता नाविन्यपूर्ण कोर्सेस तयार करावेत. विद्यार्थी, पालक, शिक्षक, संस्थाचालक यांच्यापर्यंत सर्व माहिती व्हावी

यासाठी जिल्हास्तरावर, महाविद्यालयीन स्तरावर कार्यशाळा घेतल्या जातील असे यावेळी सांगण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सर्वागिण विकासासाठी आवश्यक असणारी कौशल्ये आणि क्षमता याचा अंतर्भाव या धोरणात करण्यात आला असल्याची भावना यावेळी सदस्यांनी व्यक्त केली.