पंतप्रधान मोदींच्या गावोगावी वीज पोहोचल्याच्या दाव्याला जागतिक बँकेचे बळ

0

वॉशिंग्टन : देशातील गावागावामधील प्रत्येक घराघरांत वीज पोहोचल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता. यावरून विरोधकांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली असतानाच, या दाव्याला जागतिक बँकेने ‘बळ’ दिले आहे. भारताने विद्युतीकरण क्षेत्रात चमकदार कामगिरी केली आहे. देशातील 80 टक्क्यांहून अधिक लोकसंख्येपर्यंत वीज पोहोचली आहे, अशी शाबासकी जागतिक बँकेने दिली आहे.

जागतिक बँकेने या आठवड्यात एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यात 2010 ते 2016 या कालावधीत भारताने दरवर्षी 3 कोटी लोकसंख्येपर्यंत वीज पोहोचवली आहे. सरकारने केलेल्या दाव्याहून अधिक चांगले काम या क्षेत्रात झाले आहे, असे जागतिक बँकेच्या अहवालात म्हटले आहे.
भारतात 85 टक्के लोकांपर्यंत वीज पोहोचली आहे. हा आकडा भारत सरकारने केलेल्या दाव्यापेक्षा अधिक आहे. सरकार अजूनही 80 टक्के लोकांपर्यंत वीज पोहोचल्याचा दावा करत आहे. ही आश्‍चर्याची बाब आहे, असे जागतिक बँकेच्या व्हिव्हियन फोस्टर यांनी म्हटले आहे. बांगलादेश आणि केनियामध्ये विद्युतीकरणाचा वेग भारताच्या तुलनेत अधिक असल्याचेही फोस्टर यांनी नमूद केले.