नवी दिल्ली: विश्वचषक स्पर्धेतील आज अतिमहत्त्वाचा सामना आहे. अति महत्त्वाचा याच्यासाठी की आज जो संघ जिंकेल तो थेट अंतिम फेरीत प्रवेश करणार आहे. आज उपांत्य सामना भारताचा वि न्यूझीलंड असा रंगणार आहे. ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर येथे हा सामना होणार आहे.
भारतीय संघ या वर्ल्डकपमध्ये फक्त एक सामना पराभूत झालेला आहे. बाकी सर्व सामन्यात विजय मिळविले आहे. भारताच्या आघाडीच्या फळीने या वर्ल्डकपमध्ये दमदार कामगिरी केली आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, लोकेश राहुल या आघाडीच्या तिघांना पुन्हा एकदा भारतीय संघाला मोठी धावसंख्या उभारून द्यावी लागणार आहे. त्यासाठी न्यूझीलंडच्या वेगवान माऱ्याचा यशस्वीपणे सामना करावा लागणार आहे. कारण, सध्या न्यूझीलंडचे गोलंदाज चांगले फॉर्मात आहेत. कुठलेही पर्यायी डावपेच नसताना भारताने या वर्ल्डकपमध्ये यश खेचून आणले आहे. यात सातत्य राखण्याचे आव्हान भारतासमोर असणार आहे. त्यामुळे भारताचे रोहित, लोकेश राहुल, विराट विरुद्ध न्यूझीलंडचे लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट, जेमी नीशम, मॅट हेन्री, अशी टक्कर बघायला मिळणार आहे. दुसऱ्या बाजूला फिरकी गोलंदाजांना सहज खेळणारा केन विल्यमसन असेल आणि वेगवान गोलंदाजांना थोपवून धरणारा रॉस टेलर असेल. विल्यमसन, टेलरसह नीशम, गप्टील, मन्रो, ग्रँडहोम यांना रोखण्याचे आव्हान भारताच्या जसप्रीत बुमराह, शमी, भुवी, चहल, कुलदीप यादव यांच्यावर असणार आहे.