लॉर्डस: 2019 च्या विश्वचषक स्पर्धेत शेवटच्या सामन्यात अतिशय थरारक विजय मिळवीत विश्वविजेता बनलेल्या इंग्लंड संघाची आयर्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात अक्षरशः दाणादाण उडाली आहे. लॉर्ड्स मैदानावर होत असलेल्या या कसोटी सामन्यात पहिल्या डावात इंग्लंडचा संघ अवघ्या ८५ धावांत गारद झाला आहे. इंग्लंडसाठी हा मोठा धक्का आहे.
आयर्लंड विरुद्ध इंग्लंड यांच्यात चार दिवसीय कसोटी सामना खेळवला जात आहे. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जो रूटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला पण इंग्लंडच्या फलंदाजांनी आयर्लंडच्या गोलंदाजीपुढे सपशेल शरणागती पत्करली. वेगवान गोलंदाज टिम मुर्तागने भेदक मारा करत १३ धावांच्या मोबदल्यात ५ गडी टिपून इंग्लंडच्या फलंदाजीची कंबर मोडली. पहिल्या सत्रातच इंग्लंडचा संपूर्ण संघ माघारी परतला. इंग्लंडच्या डावात सर्वाधिक २३ धावा जो डेनलीने केल्या. त्यानंतर सॅम करन (१८) आणि ओली स्टोन (१९) वगळता एकाही फलंदाजाला दोन अंकी धावसंख्या गाठता आली नाही. पाहुण्या संघाकडून मार्क आदिरने ३ तर बोएड रँकिनने २ बळी टिपले. इंग्लंडचा संघ केवळ २३.४ षटकंच खेळू शकला.
विशेष म्हणजे आयर्लंडचा हा तिसराच कसोटी सामना आहे. याआधी अफगाणिस्तान आणि पाकिस्तानविरुद्ध प्रत्येकी एक कसोटी सामना खेळणाऱ्या आयर्लंडला दोन्हीवेळा पराभवाला सामोरे जावे लागले आहे.