जागतिक कीर्तीचे उद्योजक डॉ गंगाधर वारके साहेब यांना ठाणे येथे त्यांच्या कार्यालयात जीवन गौराव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले
लेवा भ्रातरुमंडळ, पिंपळे सौदागर, पुणे यांचेतर्फे मंडळाच्या अकराव्या वर्षात पदार्पणानिमित्त समाजातील उत्तुंग कार्य केलेल्या / करीत असलेल्या ११ व्यक्तिना जीवन गौरव वा तत्सम पुरस्कारांनी गौरवान्वित करणेचे ठरवण्यात आले होते. त्यानुसार आज दिनांक १५ एप्रिल २०२३ रोजी मुंबई येथील आपले जागतिक कीर्तीचे उद्योजक डॉ गंगाधर वारके साहेब यांना ठाणे येथे त्यांच्या कार्यालयात जीवन गौराव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. डॉ वारके हे हाय मीडिया या कंपनीचे संस्थापक अध्यक्ष आहेत. या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी रसायन क्षेत्रात अत्यत दैदीप्यमान संशोधन व उत्पादन करून जागतिक स्तरावर आपले व आपल्या देशाचे स्थान उंचावले आहे. त्यांची उत्पादने एकूण १५० देशात निर्यात होत असतात व त्यांच्या क्षेत्रातील ते जगाभरात तिसऱ्या क्रमांकाचे उत्पादक आहेत. कोविड काळात त्यांनी कोविड चाचणी साठीची आरटीपीसीआर चाचणीसाठीची उपकरणे जगभर पुरवून भारताचे स्थान जगभरात उंचावले आहे. त्यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करणेत आले आहे. अशा या उत्तुंग समाज बांधवांस जीवन गौरव देतांना खरे तर लेवा भ्रातरुमंडळ स्वतःस भाग्यवान मानते आहे. डॉ वारके यांचे कुटुंबातील त्यांची पत्नी, बंधु, मुलगा, सून, पुतण्या, असे सर्वच कुटुंबीय या उद्योगात विधि जबाबदाऱ्या सांभाळून त्यांना साथ देत आहेत.
पुरस्काराचे स्वरुपात त्यांना पुणेरी पगडी, गौरव पत्र, शाल व मंडळाचा वार्षिक अंक झेप २०२२ चि प्रत देवून मंडळाचे अध्यक्ष श्री विकास वारके, संस्थापक अध्यक्ष श्री पुरुषोत्तम पिंपळे, विशेष उपक्रम सल्लागार श्री कृष्णाजी खडसे, चिटणीस श्री नीलेश ज्ञानेश्वर पाटील,
कार्याध्यक्ष श्री अशोक भंगाळे, कार्यकारिणी सदस्य श्री मनोज चौधरी व ठाणे येथील ठाणे परिसर लेवा मंडळ सचिव श्री जयंत झांबरे, कोषाध्यक्ष श्री जयंत चौधरी, श्री तुषार चौधरी व श्री संजय सरोदे या कार्यकारिणी सदस्यांचे उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. या समारंभादरम्यान सुरवातीस लेवा भ्रातरुमंडळ प्रतिनिधींनी डॉ गंगाधर वारके यांना मंडळाच्या आजपर्यंतच्या कार्याची ओळख करून दिली. मंडळाच्या महाविद्यालयीन गुणवत्ता सुधार उपक्रमात रसायनशास्त्र महाविद्यालयांसाठी डॉ वारके यांनी काही सेमिनार्ससाठी मार्गदर्शन करणेची विनंती मंडळातर्फे मंडळ अध्यक्ष श्री विकास वारके यांनी केली. डॉ गंगाधर वारके यांनी ऑन लाइन पद्धतीने शक्य होत असल्यास अशा सेमिनार्ससाठी ते वेळ देतील असे आश्वासन दिले. तसेच मंडळ कार्यास शक्य ती अन्य मदत करतील असेही आश्वासन डॉ वारके यांनी दिले. याप्रसंगी हाय मीडिया समूहाच्या उत्पादन व कार्या विषयीच्या दोन व्हिडिओ क्लिप उपस्थितांना दाखवण्यात आल्या.
याआधी याउपक्रमाअंतर्गत मंडळाने नाशिक येथील डॉ प्रमोद महाजन (समाज कार्यकर्ते आणि प्रबोधनकार), मलकापुर येथील श्री दिलीप नाफडे साहेब (कृषीविषयक एफपीओ बाबत मार्गदर्शन), पुणे येथील पद्मश्री शीतल महाजन राणे (आंतरराष्ट्रीय स्काय डायव्हर), यांना जीवन गौरव आणि नाशिक येथील श्री अमोल महाजन (आदिवासी भागातील सामाजिक कार्य), पुणे येथील उद्योजक श्री निरंजन नारखेडे (यशस्वी उद्योजक व समाज कार्य), खिर्डी जिल्हा रावेर येथील तरुण चि. उत्कर्ष किरण नेमाडे (तरुण चित्रपट निर्माता आणि चार आंतर राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त), पुणे येथील श्री सतीश बोरोले (सामाजिक कार्य), वसई रोड येथील महिला समाज सेविका सौ किरणताई बढे (महिला सक्षमिकरण कार्य), उरळी कांचन येथील डॉ रवींद्र भोळे (प्रबोधनकार, समाज सेवक, अपंग सेवक), पुणे येथील एसकेएफ कंपनीतील तरुण होतकरू कामगार नेते श्री मयूर काशीनाथ पाटील यांना सन्मानित करण्यात आले.