यावल-रावेर धान्य घोटाळा : पुरवठा विभागाकडून स्वतंत्र कारवाई
जळगाव – रावेर येथील धान्य घोटाळ्याप्रकरणी तहसीलदारांनी केलेल्या तपासणीत यावल आणि रावेर येथील ३४ रेशनच्या दुकानांचे व्यवहार संशयास्पद असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी यांनी दिली. दरम्यान जिल्हा पुरवठा विभागातर्फे या प्रकरणात स्वतंत्र कारवाई करण्याचे अधिकार जिल्हाधिकार्यांना असुन संबंधीतांवर कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावल- रावेर तालुक्यातील गरीबांच्या तोंडचा घास हिरावून त्याचा काळा बाजार करणार्यांवर जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी यांनी दि. १४ ऑगस्ट रोजी अचानकपणे धाड टाकून गोदामातील धान्यसाठा जप्त करण्याची कारवाई केली. या कारवाईमुळे रेशनमाफीयांचे धाबे चांगलेच दणाणले. या प्रकरणी पुरवठा निरीक्षक यांच्या फिर्यादीवरून सुनील उर्फ बाळू नेवे (यावल), विलास चौधरी (रावेर) व योगेश पाटील यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर यावल आणि रावेर तालुक्यातील रेशन दुकानांच्या तपासणीचे आदेश देण्यात आले होते.
तहसीलदारांचा अहवाल प्राप्त
जिल्हा पुरवठा विभागाकडून करण्यात आलेल्या या कारवाईनंतर तहसीलदारांकडून तपासणीचा अहवाल मागविण्यात आला होता. यात यावल तालुक्यातील १०० तर रावेर तालुक्यातील ५१ रेशन दुकानांची तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी यावल तालुक्यातील २४ तर रावेरमधील १० असे एकुण ३४ रेशन दुकानांचे व्यवहार संशयास्पद आढळुन आले असल्याची माहिती पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी यांनी दिली. दरम्यान ८७ दुकानांचे तपासणीचे आदेश देण्यात आले आहे.
जिल्हाधिकार्यांना कारवाईचे अधिकार
ज्या दुकानांमध्ये संशयास्पद व्यवहार आढळून आले आहे त्या परवानाधारकांना नोटीस बजावण्यात येणार आहे. तसेच या घोटाळ्याप्रकरणी जिल्हा प्रशासनाला म्हणजेच जिल्हाधिकार्यांना देखिल स्वतंत्र कारवाईचे अधिकारी असुन जीवनावश्यक वस्तु कायदा कलम ‘ब’ नुसार संबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ज्याठिकाणी ही कारवाई झाली आहे त्याठिकाणचे गोदाम सील करण्यात आले असुन जप्त केलेल्या धान्याचा निर्णय जिल्हाधिकारी घेणार असल्याचे सुर्यवंशी यांनी सांगितले.