येडियुरप्पा यांचा राजीनामा; केवळ दोन दिवसांचे ठरले मुख्यमंत्री

0

बंगळूर-कर्नाटक निवडणुकीत भाजपने सर्वाधिक १०४ जागा मिळविल्याने सर्वात मोठा पक्ष असल्याने राज्यपालांनी भाजपला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित केले. त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून बी.एस.येडियुराप्पा यांनी शपथ घेतली. दुसरीकडे कॉंग्रेस व जेडीएसने देखील निवडणुकीनंतर आघाडी केल्याने सत्ता स्थापनेचा दावा केला. मात्र राज्यपालांनी त्यांना संधी न दिल्याने त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने आज भाजपला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले होते. मात्र भाजप बहुमत सिद्ध करू शकले नाही त्यामुळे  मुख्यमंत्री बी.एस.येडियुराप्पा यांना केवळ दोन दिवसातच पदाचा राजीनामा दिला.

१३ पानाचे भाषण

आज दुपारी ४ वाजता भाजपला विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देण्यात आले होते. यावेळी भाजप बहुमत सिद्ध करू शकले नसल्याने सरकार संपुष्ठात आले. बहुमत सिद्ध करू न शकल्याने मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी १३ पानाचे भाषण करीत राजीनामा देत असल्याचे जाहीर केले.

राजीनामा सुपूर्द

येडियुरप्पा राज्यपाल वजुभाई वाला यांच्या घरी पोहोचले आहे. ते राज्यपालांकडे आपला राजीनामा सुपूर्द करीत आहे. राजीनामा दिला असला तरी जनतेसाठी नेहमी कार्य करीत राहील असे आश्वासन देत जेंव्हा कधी निवडणुका होतील तेंव्हा भाजपा १५० पेक्षा अधिक जागा मिळवेल असा विश्वासही व्यक्त केला.

कुमारस्वामी नवीन मुख्यमंत्री 

कॉंग्रेस व जेडीएसने आघाडी करत सत्ता स्थापनेचा दावा केला असल्याने जेडीएसचे कुमारस्वामी नवीन मुख्यमंत्री असणार आहे. कॉंग्रेस नेते, माजी पंतप्रधान एच.डी.देवेगौडा, मुख्यमंत्री पदाचे उमेदवार कुमारस्वामी  दिल्लीला रवाना झाले असून  याठिकाणी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी यांची भेट घेणार आहे.

भाजपची प्रतिष्ठा धुळीस

कर्नाटकात भाजपला स्पष्ट बहुमत नसताना सरकार स्थापनेचा प्रयत्न अखेर महागात पडला. कोणतीही किंमत मोजून सत्ता मिळविण्याच्या अट्टहासात पदरी अपयश पडले आणि कर्नाटकात भाजपची प्रतिष्ठा धुळीस मिळाली. सर्वाधिक आमदार निवडून येऊनही केवळ आठ आमदार कमी पडले म्हणून भाजपने सन्मानाने विरोधी पक्षात बसणे पसंत केले असते तर पक्षाची प्रतिष्ठा वाढली असती. किमान कर्नाटकात भाजपला लोकसभा निवडणुकीत नक्कीच सहानुभूती मिळाली असती. कॉंग्रेस आणि जेडीएस या दोन पक्षांनी एकत्र येऊन सरकार स्थापनेचा दावा केलेला असताना भाजपने सत्ता बळकावण्याचे दुःसाहस करायला नको होते.